अंबाजोगाई नगरपरिषदेच्या 75 लाखांच्या वसुंधरा बक्षीस निधीच्या वितरणाला प्रशासकीय मान्यता
बीड, 14 ऑक्टोबर (हिं.स.)।महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने ‘माझी वसुंधरा अभियान ४.०’ अंतर्गत अंबाजोगाई नगरपरिषदेच्या ७५ लाख रुपयांच्या बक्षीस निधीतून करण्यात येणाऱ्या विकासकामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. या बक्षीस निधीच्या
अंबाजोगाई नगरपरिषदेच्या 75 लाखांच्या वसुंधरा बक्षीस निधीच्या वितरणाला प्रशासकीय मान्यता*


बीड, 14 ऑक्टोबर (हिं.स.)।महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने ‘माझी वसुंधरा अभियान ४.०’ अंतर्गत अंबाजोगाई नगरपरिषदेच्या ७५ लाख रुपयांच्या बक्षीस निधीतून करण्यात येणाऱ्या विकासकामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. या बक्षीस निधीच्या वितरणासाठी आमदार नमिता मुंदडा यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.

मंगळवार, दि. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्य शासनाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार, अंबाजोगाई नगरपरिषदेने सादर केलेल्या ७५ लाख रुपये किंमतीच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पाअंतर्गत शहरातील प्रमुख चौकांवर वृक्षारोपण, स्मशानभूमी परिसरात मियावाकी पद्धतीचे जंगल, योगेश्वरी उद्यान व नगरपरिषद इमारतीवर सौर ऊर्जा प्रणाली, तसेच ई-व्हेईकल चार्जिंग स्टेशन आणि एलईडी स्ट्रीटलाईट बसविण्याची कामे हाती घेतली जाणार आहेत.

नगरपरिषदेला मिळालेल्या एकूण ७५ लाख रुपयांच्या बक्षीस निधीपैकी ३७ लाख ५० हजार रुपयांचा दुसरा हप्ता मंजूर करण्यात आला आहे. या निधीचे वितरण पर्यावरण विभागांतर्गत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्फत करण्यात येणार आहे.

‘माझी वसुंधरा अभियान’च्या राज्यस्तरीय स्पर्धेत ५० हजार ते १ लाख लोकसंख्येच्या गटात अंबाजोगाई नगरपरिषदेला प्रथम क्रमांक मिळाला होता. या मान्यतेमुळे शहरात पर्यावरणपूरक प्रकल्पांना गती मिळणार असून, नागरिकांना स्वच्छ आणि हरित वातावरण लाभेल. हा निधी वितरित केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांचे आ. नमिता मुंदडा यांनी आभार मानले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande