अकोला, 14 ऑक्टोबर (हिं.स.)।महाराष्ट्र राज्यातील लाखो बांधकाम कामगारांना ५,००० रुपये दिवाळी बोनस तातडीने मिळावा, तसेच अटल बांधकाम आवास घरकुल योजना त्वरित लागू करावी आणि शासनाने स्थगित केलेल्या सर्व २८ कल्याणकारी योजना पुन्हा सुरू कराव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी बांधकाम कामगारांनी एल्गार पुकारला आहे. बुधवार, १५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजतापासुन इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ, जिल्हा कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.बिल्डींग पेंटर बांधकाम व इतर असंघटीत मजूर संघ (ट्रेड युनियन) आणि महाराष्ट्र बांधकाम संघटना स्वतंत्र कृती समिती, जिल्हा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
इतर आस्थापनांमधील कामगारांप्रमाणेच वर्षभर कष्ट करणाऱ्या बांधकाम कामगारांना दिवाळीपूर्वी ५,हजार रुपये बोनस देण्यात यावा. गरीब कष्टकऱ्यांना लाभ देण्यासाठी जिल्ह्यात अटल बांधकाम आवास योजना तात्काळ राबवून कामगारांना ५ लाख रुपयांचे अनुदान त्वरित देण्यात यावे. सर्व असंघटित बांधकाम कामगारांना राज्य कामगार विमा (ईएसआयसी) योजना लागू करावी, कामगारांचे कामाचे तास १२ वरून पुन्हा ८ तास करण्यात यावेत, कोणताही लाभ वस्तू स्वरूपात न देता थेट कामगारांच्या बँक खात्यात (DBT) जमा करावा. घरगुती कामगारांना लाभ देण्यासाठी १हजार कोटी रुपयांची तरतूद करावी.वय ६० वर्षे झालेल्या बांधकाम कामगारांसाठी निवृत्ती योजना (पेन्शन) तातडीने सुरू करावी. गंभीर आजारांसाठी १ लाख रुपये अर्थसहाय्य, तसेच नोंदणी व नूतनीकरणाचे अर्ज तात्काळ निकाली काढण्यात यावेत. आदी मागण्यासाठी बुधवार, १५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजतापासुन इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ, जिल्हा कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे