अकोला, 14 ऑक्टोबर (हिं.स.) : एकीकडे भारत देश महासत्ता होण्याचे स्वप्न बघत आहे, तर दुसरीकडे ग्रामीण भागात सुविधांचा वानवा अजूनही कायम आहे. अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील छोट्याश्या बल्हाडी गावात किडीणीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतायेत, तर अनेकांचा मृत्यू सुद्धा झाला आहे. प्रमिला बाबर या महिलेचा सुद्धा किडीणीच्या आजाराने नुकताच मृत्यू झाला आहे.
अकोला जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यातील अति दुर्गम बल्हाडी गावाच्या जमिनीतील पाण्यात क्षारचे प्राण जास्त असल्याने, या गावातील नागरिक किडनी विकाराने त्रस्त झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. अश्याच किडनी विकाराने त्रस्त एका महिलेचा शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं गावकऱ्यांच म्हणणं आहे. प्रमिला मोहन बाबर (वय ४६) असे या मृत्यू झालेल्या महिलेच नाव आहे. अकोला-बुलडाणा जिल्ह्याच्या अवघ्या 700 लोकसंख्येच नाथजोगी समाजाच्या लोकांचं बल्हाडी गाव आहे. या गावात दोनच हातपंप आहे. आणि यातील एका पंपात जास्त पाणी येत नाही. त्यामुळे संपूर्ण गाव एकाच हातपंपावरून पाणी भरते. क्षारयुक्त पाणी असल्याने गावकऱ्यांना आता किडणीस्टोन सारख्या आजाराचा सामना करावा लागतोय. गावाची लोकसंख्या कमी असल्याने, निवडणुकीशिवाय पुढारी सुद्धा गावाकडे फिरकत नसल्याची खंत गावकरी बोलून दाखवतात. तीन वर्षांआधी जलजीवन मिशन अंतर्गत गावात पाणी पुरवठा करण्याचे काम सुरू झाले होते. गावात पाईपलाईन टाकण्यात आली. पाण्याची टाकी उभी करण्यासाठी मोठा खड्डाही खोदण्यात आला. मात्र तीन वर्षांपासून हा खड्डा तसाच आहे. ना पाण्याची टाकी उभी राहिली ना पाईपलाईनमध्ये पाणी आलं. गावकरी आजही क्षारयुक्त दूषित पाण्यावरच आपली तहान भागवत आहेत.
बाळापूर मतदार संघात फक्त बल्हाडी गावच पाण्याच्या समस्येने त्रस्त नाही तर, या भागातील 70 ते 75 गावे खाऱ्या पाण्याच्या समस्येने त्रस्त आहेत. अस खुद्द बाळापूर मतदार संघाचे उबाठा गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एकोनसत्तर आणि चोवीस खेडी योजना मंजूर करून बाळापूर तालुक्यात गोड पाणी देण्याच्या योजना मंजूर करण्यात आल्या होत्या, येत्या 5 ते 6 महिन्यात ह्या योजना सुरू होतील असे आश्वासन आमदार नितीन देशमुख यांनी दिलंय, मात्र जी योजना इतक्या वर्षात सुरू झाली नाही ती 5-6 महिन्यात कशी सुरू होईल हा संशोधनाचा विषय बनला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे