जळगावमध्ये आशा स्वयंसेविकांचे जिल्हा परिषदेवर थाळीनाद करत ठिय्या आंदोलन
जळगाव, 14 ऑक्टोबर (हिं.स.) आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आशा स्वयंसेविकांनी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरत जळगाव जिल्हा परिषदेवर मोठा मोर्चा काढला. महाराष्ट्र राज्य गट प्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघाच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन आणि थाळीनाद करत शासकीय
जळगावमध्ये आशा स्वयंसेविकांचे जिल्हा परिषदेवर थाळीनाद करत ठिय्या आंदोलन


जळगाव, 14 ऑक्टोबर (हिं.स.) आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आशा स्वयंसेविकांनी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरत जळगाव जिल्हा परिषदेवर मोठा मोर्चा काढला. महाराष्ट्र राज्य गट प्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघाच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन आणि थाळीनाद करत शासकीय कर्मचारी दर्जा, थकीत मानधन, आरोग्यवर्धिनी रक्कम आणि कामावरून हटवलेल्या स्वयंसेविकांच्या पुनर्नियुक्तीसह विविध मागण्या लावून धरल्या.

आंदोलकांनी मागणी केली की, जुलै २०२५ पासून रखडलेले मानधन तातडीने अदा करावे आणि दर महिन्याच्या १० तारखेपर्यंत मानधन मिळावे. याशिवाय, आरोग्यवर्धिनी कार्यक्रमांतर्गत रक्कम कपात न करता पूर्ण द्यावी, प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची रक्कम अदा करावी, तसेच मासिक कामाचा तपशील आणि वेतन पावती मिळावी, अशा मागण्या उपस्थित केल्या. सामान्य आजारांसाठी रजा, बाळंतपणाची सुट्टी आणि आयुष्यमान भारत, हत्तीरोग, कुष्ठरोग, एनसीडी यांसारख्या राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचे थकीत मानधन देण्याची मागणीही जोरदारपणे करण्यात आली. यासोबतच, कामावरून हटवलेल्या समिना तडवी आणि अन्नू तडवी यांना तात्काळ पुन्हा नियुक्त करण्याची मागणी आंदोलकांनी लावून धरली.

या मोर्च्यात महाराष्ट्र राज्य गट प्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघाचे सरचिटणीस भगवान दवणे, डॉ. रासकर, जिल्हाध्यक्ष संगीता भामरे, भारती मस्के, निरंजना तायडे, सुलोचना साबळे, मालुताई नरवाडे, मीनाक्षी सोनवणे, सुषमा चव्हाण, भानुदास पाटील यांच्यासह २०० ते ३०० आशा स्वयंसेविकांनी सहभाग घेतला. आंदोलनानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. स्वयंसेविकांनी प्रशासनाने तातडीने मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande