मुंबई, 14 ऑक्टोबर, (हिं.स.)। भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याला अभिवादन म्हणून त्यांनी स्थापन केलेल्या केलेल्या द पीपल्स एज्युकेशन सोसायटीअंतर्गत विविध शैक्षणिक संस्था, वसतिगृहांच्या इमारतींचा जीर्णोद्धार, जतन आणि संवर्धन करण्याकरिता स्वतंत्र योजना राबविण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या योजनेतून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या नऊ शैक्षणिक संस्था आणि दोन वसतिगृहांचे जतन आणि संवर्धन केले जाणार.
भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाच्या प्रसारासाठी ८ जुलै, १९४५ रोजी द पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापन केली. या संस्थेमार्फत सन १९४६ मध्ये मुंबईत सिध्दार्थ कला व विज्ञान महाविद्यालय, सिध्दार्थ नाईट हायस्कूल, सन १९५० मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे मिलिंद कला महाविद्यालय, मिलिंद विज्ञान महाविद्यालय, सन १९५५ मध्ये मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूल आणि मिलिंद प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल, सन १९५६ मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे मिलिंद महाविद्यालय, सन १९५३ मध्ये मुंबईत सिध्दार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय, १९५६ मध्ये सिध्दार्थ विधी महाविद्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय, वडाळा सुरु करण्यात आले. याचबरोबर छत्रपती संभाजीनगर येथे अजिंठा बॉईज होस्टेल आणि प्रज्ञा मुलींचे वसतिगृह स्थापन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त (दि.९ ऑक्टोबर, २०१५ चा शासन निर्णय) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या स्थळांचा विकास करण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार वरील नऊ महाविद्यालये आणि दोन वसतिगृहे यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी स्वतंत्र योजना राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी पुढील पाच वर्षात, दरवर्षी १०० कोटी याप्रमाणे ५०० कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूद करण्यास मान्यता देण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर