चंद्रपूर, 14 ऑक्टोबर (हिं.स.)। दिवाळीनिमित्त विविध वस्तूंची खरेदी करताना ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहांनी उत्पादित केलेले खाद्यपदार्थ तसेच आकाशदिवे, उटणे यांची खरेदी करावी. तसेच या महिला गटांचा उत्साह वाढवून त्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर घालून ही दिवाळी अनोख्या पध्दतीने साजरी करावी, असे आवाहन उमेद अभियानाचे जिल्हा अभियान संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांनी केले आहे. यावर्षी सर्व पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद परिसरात दिवाळी फराळ महोत्सव 15 ते 19 आक्टोबर 2025 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.
उमेद, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्हयात मोठ्या प्रमाणात स्वयंसहायता समूह कार्यरत असून, यातील अनेक महिला नाविण्यपुर्ण वस्तूंची निर्मिती करीत असतात. येत्या दिवाळीच्या पार्श्वभूमिवर या महिलांकडून विविध स्वरुपाची खाद्दपदार्थ तयार केले जात आहेत. दिवाळीनिमित्त खाद्यपदार्थ व अनुषंगीक सजावटीच्या वस्तू नागरिकांनी खरेदी केल्यास त्याचा ग्रामीण भागातील महिलांना खूप फायदा होणार आहे. नुकेतच जिल्हा परिषद परिसरात झालेल्या गणपती महोत्सव प्रदर्शनाला चंद्रपूरकरांनी मोठा प्रतिसाद दिला होता.
सर्व तालुकास्तरावर तसेच जिल्हा मुख्यालयात जिल्हा परिषद परिसरात तथा मौलांना अब्दुल कलाम आझाद गार्डन चंद्रपूर येथे दिवाळी फराळ महोत्सव साजरा केला जाणार आहे. यात विविध साहित्य विक्रीस असणार आहे. एकमेकांना भेट देताना स्थानिक व ग्रामीण वस्तूचा वापर करावा, जेणेकरुन ग्रामीण भागातील महिलांच्या घरातही आनंद पोहोचेल, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग तसेच जिल्हा अभियान सहसंचालक मंजिरी टकले यांनी केले आहे
.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव