गडचिरोली., 14 ऑक्टोबर (हिं.स.)
गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रीय खाद्य तेल अभियान-तेलबिया २०२५-२६ या नवीन अभियानांतर्गत रब्बी हंगामातील तेलबिया पिके जसे करडई, तीळ, जवस, मोहरी, भुईमुग इत्यादींच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा गडचिरोली येथे सुमनंद सभागृहात आज संपन्न झाली.
शेतकऱ्यांमध्ये तेलबिया पिकांचे महत्त्व पटवून, याबद्दल व्यापक जनजागृती करणे, ज्यामुळे शेतकरी आणि नागरिकांना लाभ होईल, तसेच क्षेत्र, उत्पादन व उत्पादकतेत वाढ करणे, आणि पेरणीपासून काढणीपश्चात लागवडीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता.
प्रमुख मार्गदर्शन.
कार्यशाळेची सुरुवात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, प्रिती हिरळकर यांच्या प्रास्ताविकाने झाली, ज्यात त्यांनी जिल्ह्यातील रब्बी हंगाम पिके आणि करडई पिकाखालील क्षेत्र वाढविण्यासाठी कृषी विभागाने केलेल्या नियोजनाचे सादरीकरण केले.
श्री नरेंद्र जीवतोडे, संचालक, वैनगंगा व्हॅली शेतकरी उत्पादक कंपनी, नंदुरी (भद्रावती, चंद्रपूर) यांनी केवळ धान पिकावर अवलंबून न राहता हळद, ऊस आणि इतर सर्व तेलबिया चांगल्या प्रकारे पिकू शकतात हे सांगितले. तसेच, त्यांनी स्मार्ट गटशेती आणि कृषी विभागाच्या योजनेतून लाभ घेऊन गोडाऊन उभारणे आणि थेट ग्राहकांना विक्री केंद्र सुरू करण्याबाबत सविस्तर माहिती दिली.
डॉ. किशोर झाडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर, गडचिरोली यांनी सद्यस्थितीत धान पिकाची काळजी आणि तेलबिया लागवड व पीक लावताना घ्यावयाची काळजी, प्रक्रिया यावर मार्गदर्शन केले.
जिजामाता कृषी पुरस्कार प्राप्त श्रीमती प्रतिभा चौधरी यांनी महिला सक्षमीकरण आणि शेती क्षेत्रात महिलांच्या महत्त्वपूर्ण योगदानावर आपले विचार मांडले.
श्री. रमेश भुरसे, यांनी उत्कृष्ट बाजारपेठ आणि शेतमालाला योग्य बाजारभाव मिळण्याबाबत चर्चा केली. तसेच, शेतात तेलबिया व विविध पिके लागवड करून उत्पादकता वाढविण्याबाबत मार्गदर्शन केले.
सदर कार्यशाळेला जिल्ह्यातील कृषी विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी, कृषी सखी, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे संचालक, शेतकरी गटाचे सदस्य यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Milind Khond