हिंगोली ,4 ऑक्टोबर (हिं.स.)। राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियानांतर्गत कडधान्ये आणि पौष्टिक तृणधान्ये पिकांसाठी हिंगोली जिल्ह्यास २६७६ क्विंटल प्रमाणित रब्बी बियाणे वितरणाचा लक्ष्यांक प्राप्त झाला आहे. या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्त्वावर बियाण्यांचे वितरण करण्यात येणार आहे.
हरभरा पिकांच्या १० वर्षांतील वाणासाठी ५,००० रुपये प्रति क्विंटल आणि १० वर्षांवरील वाणासाठी २,५०० रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्यात येणार आहे. जिल्ह्यासाठी १० वर्षांच्या आतील वाणाकरिता १,६०० क्विंटल आणि १० वर्षांवरील वाणाकरिता ९६६ क्विंटल इतका लक्ष्यांक प्राप्त झाला आहे.
तसेच रब्बी ज्वारीसाठी १० वर्षांआतील वाणाकरिता ३,००० रुपये प्रति क्विंटल आणि १० वर्षांवरील वाणाकरिता १,५०० रुपये प्रति क्विंटल अनुदान निश्चित करण्यात आले असून, जिल्ह्यासाठी १० वर्षांआतील वाणाकरिता ४० क्विंटल व १० वर्षांवरील वाणाकरिता ७० क्विंटल लक्ष्यांक मंजूर झाला आहे.
प्रमाणित बियाणे वितरण या घटकांतर्गत आर्थिक सहाय्य प्रति शेतकरी किमान २० गुंठे ते कमाल १ हेक्टर क्षेत्राकरिता मर्यादित आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, राष्ट्रीय बीज निगम लिमिटेड यांच्या अधिकृत वितरकांकडून बियाणे घ्यावे. त्यासाठी शेतकऱ्यांनी अँग्रीस्टॅक आयडी, आधार कार्ड, ७/१२ उतारा आदी कागदपत्रांसह अनुदान वजा रक्कम भरून पक्के बिल घेणे आवश्यक आहे.
लक्ष्यांक पूर्ण होईपर्यंत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर बियाणे वाटप सुरू राहील. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी गावचे सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी किंवा उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis