जळगाव, 14 ऑक्टोबर (हिं.स.) मातंग व तत्सम समाजातील नागरिकांच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी महाराष्ट्र शासनामार्फत स्थापन करण्यात आलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या विविध अर्थसहाय्य योजनांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात जळगाव जिल्ह्यासाठी ५० लाभार्थ्यांना अनुदान योजना व ५० लाभार्थ्यांना बीजभांडवल योजनेअंतर्गत कर्जपुरवठ्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
या योजना मातंग समाजातील १२ पोटजातींतील व्यक्तींसाठी लागू आहे. ज्यात (1) मांग (2) मातंग (3) मिनी मादींग (4) मादींग (5) दानखणी मांग (6) मांग महाशी (7) मदारी (8) राधेमांग (9) मांग गारुडी (10) मांग गारोडी (11) मादगी (12) मादिगा. या जातींचा समावेश आहे. १८ ते ५० वयोगटातील इच्छुक अर्जदारांना अर्ज करता येणार आहे. अर्जदाराकडे आवश्यक कागदपत्रांसह अनुभव, व्यवसायाचे ज्ञान, उत्पन्न मर्यादा व इतर अटींची पूर्तता असणे आवश्यक आहे. अर्ज नमुने जिल्हा कार्यालयात विनामूल्य उपलब्ध असून अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक साहित्सरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, जळगाव येथे संपर्क साधावा. महामंडळामार्फत अनुदान, बीजभांडवल, थेट कर्ज तसेच शैक्षणिक कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. इच्छुक महिला व पुरुषांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक गो.ज. पगारे यांनी प्रसिध्दि पत्रकाद्वारे केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर