नांदगाव पेठ जिल्हा परिषद सर्कलमध्ये महिला आरक्षणानंतर राजकीय समीकरणे पालटली 
अमरावती, 14 ऑक्टोबर (हिं.स.)नांदगाव पेठ जिल्हा परिषद सर्कलमध्ये सर्वसाधारण महिला आरक्षण लागू झाल्यानंतर राजकीय वातावरणात मोठी उलथापालथ सुरू झाली आहे. या सर्कलचा राजकीय इतिहास नेहमीच रंगतदार राहिला असून, आता पुन्हा एकदा महिला नेतृत्वाची नव्या जोमाने
नांदगाव पेठ जिल्हा परिषद सर्कलमध्ये महिला आरक्षणानंतर राजकीय समीकरणे पालटली  गुल्हाने, हटवार, केचे,इंगळे, ठाकरेंची मोर्चेबांधणी सुरू


अमरावती, 14 ऑक्टोबर (हिं.स.)नांदगाव पेठ जिल्हा परिषद सर्कलमध्ये सर्वसाधारण महिला आरक्षण लागू झाल्यानंतर राजकीय वातावरणात मोठी उलथापालथ सुरू झाली आहे. या सर्कलचा राजकीय इतिहास नेहमीच रंगतदार राहिला असून, आता पुन्हा एकदा महिला नेतृत्वाची नव्या जोमाने परीक्षा होणार आहे.एका दशकापासून या सुवर्णकाळाची प्रतीक्षा करणाऱ्या अनेक पुरुष उमेदवारांच्या स्वप्नांवर पाणी फेरल्या गेले असले तरी आपले एका तपाचे परिश्रम व्यर्थ न जाऊ देता क्षणार्धात आपल्या गृहलक्ष्मीला निवडणुकीच्या रणांगणात उभे केले आहे.आरक्षण सोडतीनंतर लगेच पोस्टरवॉर करून नांदगाव पेठ जिल्हा परिषद सर्कलमधील निवडणुकीचे चित्र थोडेफार तरी स्पष्ट झाले आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या मतदारसंघात गेल्या दोन दशकांत तीन वेगवेगळ्या पक्षांनी सत्ता गाजवली आहे. 2001 मध्ये शिवसेनेचे नितीन हटवार 2006 मध्ये शिवसेनेच्या मनीषा नितीन हटवार, 2011 मध्ये काँग्रेसचे विनोद डांगे, तर 2017 मध्ये भाजपच्या भारती गेडाम यांनी विजय मिळवून पक्षाच्या विजयश्रीची नोंद केली होती.राज्यात आणि देशात भाजप सत्तेत असल्याने आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजप आणि मित्रपक्षांनी विजयाचा दावा ठोकल्याने यावेळी भाजपकडून मनीषा विवेक गुल्हाने या प्रबळ दावेदार म्हणून समोर आल्या आहेत. त्यांचे पती व भाजप चे जिल्हा उपाध्यक्ष विवेक गुल्हाने यांनी गेल्या आठ वर्षांत मतदारसंघात सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि रुग्णसेवा या क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्थानिक स्तरावर पाय रोवलेल्या गुल्हाने दाम्पत्याने विकासाच्या माध्यमातून आपला जनाधार मजबूत केला आहे. त्यामुळे मनीषा गुल्हाने या भाजपकडून निर्णायक उमेदवार ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जाते. दुसऱ्या बाजूला, शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मनीषा नितीन हटवार या पुन्हा मैदानात उतरण्याची तयारी करीत आहेत. 2006 मध्ये त्यांनी या मतदारसंघात भगवा फडकवत शिवसेनेला जिल्हा परिषदेत स्थान मिळवून दिले होते. नितीन हटवार हे वयाच्या विसाव्या वर्षापासून सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असून, त्यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेच्या योजना गावोगाव पोहोचल्या. त्यामुळे या दाम्पत्याचा सामाजिक पाया मजबूत असून, हटवार कुटुंब पुन्हा एकदा आपला गड राखण्यासाठी सज्ज झाले आहे.तर काँग्रेसकडून सुनंदा जनार्दन केचे या संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. त्यांचे कुटुंब पारंपरिक काँग्रेस विचारसरणीचे असून,नांदगाव पेठ येथील स्व. हिरामण भिलकर यांची कन्या सौ. सुनंदा जनार्दन केचे या २०११ ते २०१६ दरम्यान पंचायत समिती सदस्य व महिला-बालकल्याण समिती सदस्य म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या कार्यकाळात नांदगाव पेठ जिल्हा परिषद हायस्कूलची नवी इमारत उभी करण्यात आली.सौ. केचे आजही आपल्या कार्यशील आणि लोकसंग्रही भूमिकेमुळे स्थानिक राजकारणात ओळख टिकवून आहेत. विकासकामे आणि दांडगा जनसंपर्क ही त्यांची ताकद मानली जाते. त्यामुळे काँग्रेसही या सर्कलमध्ये महिलांच्या माध्यमातून आपला हरवलेला गड परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. याशिवाय, भाजयुमो जिल्हाध्यक्ष सचिन इंगळे यांच्या पत्नी योगेश्वरी इंगळे आणि डिगरगव्हाण येथील सरपंच जिल्लेश्वरी ठाकरे या देखील संभाव्य उमेदवारांच्या चर्चेत असून, त्यांच्या प्रवेशामुळे निवडणुकीची रंगत अधिक वाढली आहे.सध्याच्या घडीला या सर्कलमध्ये महिलांचीच खरी चुरस पाहायला मिळत आहे.निवडणुकीपूर्वी कोण रिंगणात असणार आणि कोण बाहेर ही मात्र येणारी वेळच ठरवेल मात्र पुरुष नेतृत्वाऐवजी आता महिला उमेदवार विकास, सामाजिक काम आणि संघटनशक्तीच्या जोरावर रिंगणात उतरल्या आहेत.नांदगाव पेठ सर्कलचा हा राजकीय संघर्ष केवळ पक्षीय लढाई न राहता महिला नेतृत्वाच्या बळकटीकरणाचा प्रतीक ठरणार आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande