पुणे, 14 ऑक्टोबर, (हिं.स.)। राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे घेण्यात येत असलेल्या नियतकालिक मूल्यांकन चाचणीच्या प्रश्नपत्रिका फुटीचे सत्र काही थांबता थांबेना अशी अवस्था आहे. इंग्रजी विषयाच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच समाजमाध्यमांत उपलब्ध झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
राज्यातील दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती तपासण्यासाठी स्टार्ट प्रकल्पाअंतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे दहा माध्यमांत नियतकालिक मूल्यांकन चाचण्या घेतल्या जातात. त्यात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १, संचलित मूल्यमापन चाचणी २ या परीक्षांचा समावेश असतो. त्यासाठी प्रथम भाषा, तृतीय भाषा (इंग्रजी), गणित या विषयांच्या प्रश्नपत्रिका एससीईआरटीकडून तयार करून शाळांना पुरवण्यात येतात. त्यानुसार शुक्रवारपासून परीक्षा सुरू झाली. सोमवारी इंग्रजी विषयाची परीक्षा होती.
मात्र, त्याची प्रश्नपत्रिका त्यापूर्वीच समाजमाध्यमांत उपलब्ध झाल्याचे निदर्शनास आले. तसाच प्रकार शुक्रवारच्या गणित विषयाच्या परीक्षेबाबतही झाला होता. नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांतील प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकार सातत्याने घडत आहेत. या पूर्वी काही प्रकरणांमध्ये एससीईआरटीकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु