परभणी, 14 ऑक्टोबर (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि आयुक्त, दिव्यांग कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी तर्फे “दिव्यांग वैश्विक प्रमाणपत्र वाटप शिबिर व दिव्यांगा प्रती संवेदनशीलता व जागृती” या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही कार्यशाळा बुधवार, १५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता, जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथे होणार आहे.
या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उज्वला नंदेश्वर उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार, तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव भूषण म. काळे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यशाळेस दिव्यांग बांधवांनी उपस्थित राहून शासनाच्या विविध योजनांचा लाभ व माहिती घ्यावी, असे आवाहन सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis