परभणी, 14 ऑक्टोबर (हिं.स.)। अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना, परभणी जिल्ह्यातील सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचारी व्हॉट्सअप गटाने सामाजिक जाणिवेचा आदर्श घालत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 लाख 42 हजार 128 रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्याकडे सुपुर्द केला. जिल्हाधिकारी चव्हाण यांनी या आर्थिक योगदानाबद्दल मनापासून कौतुक करत कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
शेतकऱ्यांच्या संकट काळात मदतीचा हात पुढे करण्याचा निर्णय गटाने एकमताने घेतला. सदस्यांच्या स्वेच्छेने जमा केलेल्या या निधीमुळे सामाजिक बांधिलकीचे जिवंत उदाहरण निर्माण झाले आहे.गटाचे संयोजक म्हणाले, “शेतकरी हा आपल्या समाजाचा कणा आहे. त्यांच्यावर संकट आले असताना आपणही समाजाचा भाग म्हणून योगदान देणे हीच खरी सामाजिक जबाबदारी आहे.”या प्रेरणादायी कार्याचे जिल्हाभर कौतुक होत असून, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या या योगदानाने समाजातील इतर घटकांनाही प्रेरणा मिळत आहे.या प्रसंगी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी इप्पर, समाजसेवा अधीक्षक संदीप निळकंठे, सहाय्यक महसूल अधिकारी नवनाथ मुतंगे आणि कक्ष समन्वयक अभिषेक दिवाण उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis