सोलापूर, 14 ऑक्टोबर, (हिं.स.)। थकीत ऊस बिलासाठी शेतकऱ्यांनी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या निवासस्थानासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. म्हेत्रे यांच्याशी संबंधित असणाऱ्या मातोश्री शुगर या साखर कारखान्याने गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांच्या उसाची जवळपास पाच कोटींची रक्कम थकवली आहे. या वर्षीही गाळप परवाना नसताना उसाचे गाळप करून शेतकऱ्यांची रक्कम थकवली आहे.
अक्कलकोट तालुक्यातील रुद्रवाडी येथील मातोश्री शुगर कारखान्याने २०२३-२४ या हंगामात गाळलेल्या उसाचे काही शेतकऱ्यांचे बिल अद्याप दिले नाही. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी माजी गृहराज्यमंत्री म्हेत्रे यांच्या सोलापुरातील लक्ष्मी निवास या बंगल्यासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या हंगामातील ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी अवघ्या पाच टक्के शेतकऱ्यांना त्यांची पूर्ण रक्कम मिळाली आहे तर काही शेतकऱ्यांना १८०० रुपयांप्रमाणे पैसे मिळाले आहेत. मात्र, काही शेतकऱ्यांना गेली दोन वर्षे एक रुपयाही मिळाला नाही, असा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. या हंगामात कारखान्याकडून २७०० रुपये भाव देण्याचे आश्वासन दिले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड