सोलापूर, 14 ऑक्टोबर, (हिं.स.)। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि एमआयएम या दोन पक्षांना धक्का देताना भारतीय जनता पार्टीने आपल्या सत्तेचा पुरेपूर फायदा घेत महापालिकेची अंतिम प्रभाग रचना करताना काँग्रेस आणि एमआयएमचे प्रभाग फोडले आहेत. एकीकडे तत्कालीन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा मिस्त्री आणि एमआयएम कडून नगरसेवक झालेले राष्ट्रवादीचे नेते तोफिक शेख या दोघांना समोरासमोर आणून ठेवले आहे. 2017 च्या महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला 14, एमआयएम पक्षाला 9 जागा मिळाल्या होत्या. यामध्ये प्रभाग क्रमांक 20, प्रभाग क्रमांक 15 मधून काँग्रेसचे चार चार नगरसेवक निवडून आले. प्रभाग सोळा मध्ये दोन, प्रभाग 14 मध्ये एक, प्रभाग 18 मध्ये एक आणि प्रभाग 26 मधून 2 असे 14 नगरसेवक निवडून आले होते. त्याचबरोबर एमआयएम पक्षामधून प्रभाग क्रमांक 21 मध्ये चार, प्रभाग क्रमांक 14 मध्ये तीन क्रमांक, 17 मध्ये एक आणि विजापूर नाका भागातून पूनम बनसोडे असे 9 नगरसेवक निवडून आले.यंदाच्या महापालिकेची प्रभाग रचनाही 2017 च्या प्रभाग रचनेनुसारच करण्यात आली होती. परंतु त्यानंतर हरकती घेतल्यानंतर अंतिम प्रभाग रचना करताना भारतीय जनता पार्टीने प्रभाग 20, 21, 16, 15, 14 हे काँग्रेस आणि एमआयएमचे प्रमुख प्रभाग फोडले आहेत.
प्रभाग एकवीस मध्ये आता या ठिकाणी तौफिक शेख निवडून आले होते. तो भाग प्रभाग वीसला जोडून देण्यात आला आहे. त्यामुळे आता बाबा मिस्त्री आणि तौफिक शेख एकमेकांच्या समोरासमोर आले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड