सिरोंचा व मार्कंडा येथील विकासकामांना गती द्या - विजयलक्ष्मी बिदरी
गडचिरोली, 14 ऑक्टोबर, (हिं.स.) - सिरोंचा व मार्कंडा परिसरातील राष्ट्रीय महामार्ग, महसूल व पर्यटन क्षेत्रातील विकासकामांना गती देण्याचे निर्देश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिले. विभागीय आयुक्त यांनी आज महसूल, राष्ट्रीय महामार्ग, वन,
विकासकामाचा आढावा घेताना विभागीय आयुक्त व इतर अधिकारी


गडचिरोली, 14 ऑक्टोबर, (हिं.स.) - सिरोंचा व मार्कंडा परिसरातील राष्ट्रीय महामार्ग, महसूल व पर्यटन क्षेत्रातील विकासकामांना गती देण्याचे निर्देश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिले.

विभागीय आयुक्त यांनी आज महसूल, राष्ट्रीय महामार्ग, वन, सार्वजनिक बांधकाम, पंचायत समिती, कृषी, नगर पंचायत, भूमी अभिलेख आदी विभागांच्या कामांचा सविस्तर आढावा सिरोंचा येथील नवबौद्ध मुलींची शाळेच्या सभागृहात घेतला. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, अपर जिल्हाधिकारी संजय आसवले, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कुशल जैन, उपविभागीय पोलिस अधिकारी संदेश नाईक, उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, तहसीलदार निलेश होनमोरे, तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

*राष्ट्रीय महामार्ग व विकासकामांचा आढावा*

बैठकीदरम्यान विभागीय आयुक्तांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३C च्या कामाचा आढावा घेतला. त्या वेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पुढील ६ महिन्यांच्या आत काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तर वन विभागाने विकास कामांच्या संदर्भातील आवश्यक परवानग्या त्वरित मंजूर करण्याबाबत त्यांना सूचना देण्यात आल्या. यावेळी महसूल विभागामार्फत ‘सेवा पंधरवडा अभियानाचा आढावाही त्यांनी घेतला. तहसीलदार निलेश होनमोरे यांनी सिरोंचा तालुक्याची माहिती सादर केली.

*मोत्यांच्या शेतीला भेट व प्रोत्साहन*

विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी व जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी शेतकरी रवी बोंगोनी यांच्या मोतीशेती प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. या नाविन्यपूर्ण शेती पद्धतीसाठी शासनस्तरावरून मदत आणि प्रोत्साहनाचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश तालुका कृषी अधिकारी यांना देण्यात आले. या भेटीत त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

*मार्कंडा येथील विकास कामांची पाहणी*

विभागीय आयुक्त श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांनी सकाळी मार्कंडा येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) सौंदर्यीकरण व परिसर विकासाच्या कामांची पाहणी केली व सदर कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. त्यांनी मार्कंडा मंदिरात सुरू असलेल्या भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या पुरातत्त्वीय संवर्धन कामांची पाहणी केली व मंदिराची वास्तुरचना, इतिहास आणि शिल्पकलेसंबंधी माहिती उप अधीक्षक पुरातत्त्व अधिकारी डॉ. सोनवणे यांच्याकडून जाणून घेतली.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, चामोर्शी चे उपविभागीय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी अरूण एम., उप अधीक्षक पुरातत्व अधिकारी डॉ. सोनवणे, सहाय्यक पुरातत्व अधिकारी श्याम बोरकर, वरिष्ठ संवर्धन सहायक शुभम कोरे तसेच रस्ते विकास महामंडळ व इतर संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande