मविआ आणि मनसेच्या शिष्टमंडळाने घेतली निवडणूक अधिकाऱ्यांची भेट
मुंबई, 14 ऑक्टोबर (हिं.स.) : महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत निवेदन सादर केले. निवडणुकीची प्रक्रिया पारदर्
मविआ आणि मनसेच्या नेत्यांनी घेतली निवडणूक आयुक्तांची भेट


मुंबई, 14 ऑक्टोबर (हिं.स.) : महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत निवेदन सादर केले. निवडणुकीची प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष ठेवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, खासदार वर्षा गायकवाड, शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील, माकपचे अजित नवले, समाजवादी पार्टीचे रईस शेख आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सुभाष लांडे यांचा समावेश होता.यावेळी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली असली तरी काही मुद्दे अपूर्ण राहिल्याने, उद्या (15 ऑक्टोबर) मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम आणि मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्यासोबत शिष्टमंडळाची संयुक्त बैठक होणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. बैठकीनंतर पत्रकार परिषदही होणार आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाची भेट घेण्याआधी संजय राऊत यांनी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडणूक प्रक्रियेत गंभीर गैरप्रकार होत असल्याचा आरोप केला. त्यांनी ठाणे आणि मुंबईत बोगस मतदार मोठ्या प्रमाणात असल्याचा दावा केला, तर नाशिकमध्ये साडेतीन लाख बोगस मतदार असल्याचंही सांगितलं. “विधानसभा निवडणुकीत आम्हाला याचा फटका बसला होता. तोच अनुभव महापालिका निवडणुकीत येऊ नये म्हणून आम्ही निवडणूक आयोगाकडे जात आहोत,” असं राऊत यांनी स्पष्ट केलं. तसेच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट प्रणाली का वापरली जात नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

यावेळी मनसे महाविकास आघाडीत सहभागी होणार का, यासंदर्भात राऊत म्हणाले की, “हा प्रश्न राज ठाकरेंनाच विचारावा. मात्र, मनसे आणि शिवसेना काही मुद्द्यांवर एकत्र आहेत. बाकी जे इच्छुक असतील, ते आमच्यासोबत येतील असे राऊत यांनी सांगितले.

----------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande