पुणे, 14 ऑक्टोबर (हिं.स.)शिक्षण विभागाकडून विविध उपक्रम राबविण्याबाबतच्या सूचना शाळांना देण्यात आलेल्या आहेत. मात्र, शाळांकडून उपक्रम राबविल्याबाबतची काहीच माहिती पुण्याच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे सादर होत नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. प्रलंबित कामकाजाचे गांभीर्य लक्षात घेत प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील शाळांनी, केंद्रांनी त्यांच्या स्तरावर राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती सादर करण्याबाबत वारंवार कार्यालयाकडून व्ही.सी.व्दारे, व्हॉटसॲपव्दारे, तोंडी संदेशाद्वारे, लेखी पत्राद्वारे अशा विविध माध्यमद्वारे सूचना देण्यात आल्या होत्या.मात्र, त्याला विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकांकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पुणे जिल्ह्याचे कामकाज प्रलंबित राहत असल्याचे निदर्शास आले. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली. ज्या केंद्रातील शाळांची माहिती उपलब्ध होणार नाही तसेच पोर्टलवर अपलोड होणार नाही त्या विस्तार अधिकरी, केंद्रप्रमुख व त्या शाळांचे मुख्याध्यापक यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल, असे पुणे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु