अमरावती, 16 ऑक्टोबर, (हिं.स.)।
दिवाळीनिमित्त शहरात पोलिसांचा कडेकाट बंदोबस्त राहणार आहे. बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ वाढणार असल्याने वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यावर पोलिसांचा विशेष भर राहणार आहे. यासाठी पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन याबाबत सूचना केल्या.
दिवाळीच्या खरेदीसाठी अमरावतीकर मोठ्याप्रमाणात बाजारपेठेत गर्दी करणार आहे. यातच राजकमल ते रेल्वेस्टेशनकडे जाणारा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी होऊ नये याकडे वाहतूक पोलिसांनी विशेष काळजी घ्यावी. तसेच दिवाळीनिमित्त पूजेसाठी घरातील देव्हाऱ्यात मौल्यवान वस्तू ठेवल्या जातात. त्यावर डल्ला मारण्यासाठी चोरट्यांकडून घरफोडीच्या घटना घडू शकतात. यासाठी रात्र गस्त वाढविण्याच्या सूचना पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी दिल्या. कोणतीही अप्रिय घटना घडणार नाही याची काळजी घेण्याच्या यावेळी सूचना देण्यात आल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी