लासलगाव, 19 ऑक्टोबर (हिं.स.)।
भारतीय रेल्वेच्या विशेष अभियान 5.0 अंतर्गत भुसावळ विभागातील लासलगाव रेल्वे स्थानकावर “अमृत संवाद” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमात रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रवाशांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या सूचना, अभिप्राय आणि अपेक्षा जाणून घेतल्या.
या संवादाचे आयोजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिपादित केलेल्या “पंचप्राण” तत्वांच्या आधारे करण्यात आले होते. “विकसित भारत” घडविण्यात प्रत्येक प्रवाशाचा आणि नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश लासलगाव रेल्वे स्थानकावर ‘अमृत भारत स्टेशन योजना’ अंतर्गत करण्यात आलेल्या पुनर्विकास कामांचा आढावा घेणे आणि प्रवाशांच्या सुविधा आणखी सुधारण्यासाठी सूचना मिळवणे हा होता.
या वेळी रेल्वेच्या वतीने सहायक वाणिज्य व्यवस्थापक, स्थानकप्रमुख, मुख्य वाणिज्य निरीक्षक तसेच अन्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. प्रवाशांनी नव्याने करण्यात आलेल्या सुविधांविषयी समाधान व्यक्त केले.
लासलगाव स्थानकावर अमृत भारत योजनेअंतर्गत आधुनिक सुविधा उभारण्यात आल्या आहेत.यात नवीन प्रतीक्षालय, स्वच्छतागृहे,आकर्षक प्लॅटफॉर्म शेड,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सर्क्युलेटिंग एरियाचे सौंदर्यीकरण, कोच मार्गदर्शन प्रणाली आणि दिशादर्शक फलकांचा समावेश आहे.
या अमृत संवादादरम्यान प्रवाशांच्या अडचणी,सूचना व अपेक्षा रेल्वे अधिकाऱ्यांनी आत्मीयतेने ऐकून घेतल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV