मराठवाड्यात महायुती आणि मविआचा स्वतंत्र निवडणुका लढवण्यावर भर
छत्रपती संभाजीनगर, 19 ऑक्टोबर (हिं.स.) आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी मराठवाड्यात महायुतीचा राग आळवला जात असला तरी भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वेगळ्या बैठका सुरू आहेत. त्यामुळे स्वबळावर निवडणुका लढविण्यावर अधिक भर दिल
मराठवाड्यात महायुती आणि मविआचा स्वतंत्र निवडणुका लढवण्यावर भर


छत्रपती संभाजीनगर, 19 ऑक्टोबर (हिं.स.)

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी मराठवाड्यात महायुतीचा राग आळवला जात असला तरी भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वेगळ्या बैठका सुरू आहेत. त्यामुळे स्वबळावर निवडणुका लढविण्यावर अधिक भर दिला जात आहे.

मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यात नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि बीड या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना वेगळ्या बैठकात स्वतंत्रपणे घेत आहेत. महाविकास आघाडी मध्ये देखील बेबनाव पाहायला मिळतो शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट याही बैठका वेगळ्या घेत आहेत.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुती एकत्र लढणार असे शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडून सांगितले जाते. मात्र स्थानिक पातळीवर त्या त्या मतदारसंघातील आमदारांची आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांची वेगळीच भूमिका असल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार या तीनही नेत्यांनी महायुतीचा राग आळवला असला तरी आमदारांचा मूड मात्र वेगळाच दिसतो.

इकडे मराठवाड्यात एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारांनी स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. सिल्लोड सोयगाव मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार आणि कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी महायुती नको, स्वबळावर शिवसेनेचा भगवाच फडकवणार, असे म्हणत दंड थोपटले आहेत.

दोन दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महायुती म्हणून आम्ही एकत्रितच लढणार असल्याचे स्पष्ट केले होते.

कार्यकर्ते आपल्या भावना व्यक्त करत असतात. परंतु लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीप्रमाणेच महापालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायत समिती या निवडणुका आम्ही युतीत लढणार आहोत असे शिंदे ठामपणे म्हणाले होते. परंतु ज्या पद्धतीने शिवसेनेचे काही आमदार स्वबळावर लढण्याची भाषा करत आहेत, तशीच भाजपकडूनही केली जात आहे.मराठवाड्याचा विचार केला तर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी महायुती म्हणून एकत्र लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. परंतु अब्दुल सत्तार यांनी तर मतदारसंघात पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा स्वतंत्र मेळावा घेत स्वबळाची घोषणाच करून टाकली.

माझ्या मतदारसंघातील नगर परिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा संस्थांमध्ये केवळ शिवसेना आणि शिवसेनेचेच उमेदवार निवडून येतील असा दावा सत्तार यांनी केला आहे. २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अब्दुल सत्तार अवघ्या १४२० मतांनी विजयी झाले. महायुती असली तरी भाजपशी त्यांचे संबंध कमालीचे ताणले गेलेले आहेत.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande