कोल्हापूर, 19 ऑक्टोबर (हिं.स.)।
गोरगरिबांच्या रुग्णसेवेमुळे माझा लौकिक संपूर्ण देशभर वाढला, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. जिवात जीव असेपर्यंत अखेरच्या श्वासापर्यंत गोरगरिबांची रूग्णसेवा प्राणपणाने करीतच राहू, असेही ते म्हणाले.
हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या माध्यमातून पाठपुरावा करून मुंबईत मोफत उपचार झालेल्या रुग्णांच्या शतायुषी व्हा..... या स्नेहमेळाव्यात मंत्री मुश्रीफ बोलत होते. या मेळाव्याला गेल्या वर्षभरात उपचार झालेल्या अडीच हजारावर रुग्णांची उपस्थिती होती.
भाषणात मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, तुमचे जीवन सुखी आणि समाधानी व्हावी हेच माझे अंतिम ध्येय आहे. जो पीडित आहे त्याच्या सेवेसाठी मी सदैव तत्पर आहे. गोरगरीब रुग्णांवर महागडे उपचार करावयाचे झाल्यास त्यांना मरणाची वाट बघण्याशिवाय पर्याय नसायचा. त्यांच्याही जीवनात आनंद फुलवण्यासाठी सुधारित ट्रस्ट ॲक्ट करू शकलो. या कायद्यामुळे पुणे- मुंबईतील मोठमोठ्या दवाखान्यांमध्येही आज गोरगरीब रुग्णांना सन्मानाने मोफत उपचार मिळत आहेत. दीडशे कोटीहून अधिक निधीमधून सीपीआरचे संपूर्ण नूतनीकरण व नवीन आरोग्य सुविधा निर्माण होत आहेत. शेंडा पार्कमध्ये साकारत असलेल्या सुसज्ज व आद्ययावत आरोग्य सुविधांमुळे कोणतेही उपचारासाठी रुग्णांना पुणे मुंबईला जावे लागणार नाही.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, गोरगरीब रुग्णांची सेवा करीत असताना अंतरात्म्याच्या तळमळीतून ही सेवा केली. या सेवेमध्ये कधीच गट तट, पक्ष- पार्टी, जात- धर्माचा विचार केला नाही. प्रत्यक्षात समरजीत घाटगेनी जरी पेशंट पाठविला तरी मी आनंदाने आणि तळमळीने 'रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा' मानून सेवा करीन.
पाडळी ता. करवीर येथील अमर पाटील आपल्या मुलाच्या उपचाराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना म्हणाले, कु. आरुष हा माझा चार वर्षांचा मुलगा आहे. तो दीड वर्षाचा असतानाच त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे निदान झाले. त्यानंतर मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या माध्यमातून मुंबईला उपचार सुरू झाले. एक वर्षांपूर्वीच त्याच्यावर एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये किडनी रोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. अशा हजारो चिमुकल्यांना श्री. मुश्रीफ यांनी साक्षात जीवदान दिले आहे.
कार्यक्रमात सर्व रुग्णांना मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते फुले देऊन निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच; दिवाळी फराळाचेही वाटप झाले.
व्यासपीठावर गोकुळचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील, गोकुळचे संचालक युवराज पाटील, बाजार समितीचे सभापती अध्यक्ष सूर्यकांत पाटील, ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, रामगोंडा उर्फ तात्या पाटील, प्रकाशराव गाडेकर आदी प्रमुख उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar