सोलापूर, 19 ऑक्टोबर (हिं.स.)।
पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील सुरक्षा कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून चक्क चिकन मसाला देण्यात आला आहे. मंदिराला सुरक्षा व्यवस्था पुरवणाऱ्या बीव्हीजी कंपनीकडून ही भेटवस्तू देण्यात आली आहे. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जातो आहे. सुरक्षा कर्मचारी आणि विठ्ठल भक्तांमध्ये यावरून तीव्र नाराजी आहे. सोशल मीडियावर याचा व्हिडीओसुद्धा प्रचंड व्हायरल होतो आहे.
विठ्ठल रुख्मिणी मंदिराला सुरक्षा कर्मचारी पुरण्याचं कंत्राट बीव्हीजी कंपनीकडे आहे. या कंपनीकडून कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त भेटवस्तू देण्यात आली. मात्र, भेटवस्तूच्या पिशवीत चक्क चिकन मसाला निघाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. खरं तर पंढरपूर हे वारकरी संप्रदायाचे केंद्रस्थान आहे. वारकरी मांसाहार किंवा मद्यपान करत नाहीत. अशा प्रवित्र ठिकाणी चक्क चिकन मसाला वाटप झाल्या अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. समाजमाध्यमांवर याबाबत रोष व्यक्त केला जातो आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड