सोलापूर, 19 ऑक्टोबर (हिं.स.)।
शहराला तीन दिवसाआड पाणी द्या, तसेच वेळेत बदल करा, अशी मागणी नागरिकांची आहे. मात्र तांत्रिक अडचणी लक्षात घेता पाणीपुरवठ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केला जाणार नाही. शहराला तीन, चार अन् पाच दिवसांआड पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महापालिका सार्वजनिक आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर विजेमुळे शहर पाणीपुरवठा विस्कळित झाला. शहर हद्दवाढ भागातील नागरिकांनी पाच दिवसाआड पाणी देता, पाण्याच्या वेळा तरी पाळा आणि नागरिकांना सोयीच्यावेळी पाणीपुरवठा करा, अशी मागणी जनता दरबारमध्ये केली होती. मात्र महापालिकेने तांत्रिक कारणामुळे सध्या शहराचा पाणीपुरवठा जैसे-थे राहील, असे स्पष्ट केले आहे.
यामध्ये साखर पेठ, रेल्वे लाईन, विजापूर वेस, सेटलमेंट, बाळे, देगाव, भद्रावती पेठ पाणी टाकी परिसर, दोन नं. झोपडपट्टी या ठिकाणी तीन दिवसाआड आणि आदित्य नगर, सोरेगाव रोड, नेहरू नगर टाकी परिसर, सैफूल हॉटेल परिसर येथे चार दिवसांआड तर उर्वरित शहर हद्दवाढ भागात पाच दिवसांआड पाणी दिले जाते. हा पाणीपुरवठा कायम असणार आहे. वेळेत आणि दिवसांमध्ये कोणतेही बदल होणार नसल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड