परभणी, 2 ऑक्टोबर (हिं.स.)। नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने मागील नऊ दिवसांपासून शहरातील विविध भागात दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले होते. या दौडींमध्ये मोठ्या संख्येने पुरुष, महिला, युवक व युवतींनी उत्साहाने सहभाग नोंदवला. पारंपरिक पोशाख, ढोल-ताशे आणि जयघोषाच्या गजरात झालेल्या या दौडींनी संपूर्ण परभणी शहर दुमदुमून गेले. विजया दशमीच्या दिवशी दुर्गामाता दौड अष्टभुजा मंदिरापासून मोठ्या जल्लोषात सुरू झाली. शिवाजी चौक, कच्ची बाजार, माळी गल्ली, सावित्रीबाई फुले पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, स्टेशन रोड अशा प्रमुख मार्गांवरून जात अखेर अष्टभुजा मंदिर येथे या दौडीची सांगता झाली.
या दौडीत सहभागी झालेल्या तरुणांनी “जय भवानी, जय दुर्गामाता”च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. महिलांनी व युवतींनीही पारंपरिक वेषभूषेत सहभागी होत देवीची आराधना केली. शहरातील नागरिकांनी मार्गावर उभे राहून सहभागींचे स्वागत केले. विविध सामाजिक व सांस्कृतिक संघटनांनी देखील दौडीत सहभाग घेतला.
नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या दुर्गामाता दौडीमुळे तरुणाईत धार्मिक उत्साहाबरोबरच एकात्मतेचा संदेशही देण्यात आला. संपूर्ण परभणी शहरात नवरात्राचा उत्साह आणि भक्तिमय वातावरण यामुळे दिवसभर जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis