पुणे, 20 ऑक्टोबर (हिं.स.)।बनावट व निकृष्ट औषधांविरुद्ध लढा देण्यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवर लसी, प्रतिजैविके , मानसोपचार तसेच कर्करोगावरील औषधे यांच्यावर बारकोड आणि क्यूआर कोड छापण्याचा निर्णय लागू करण्याचा विचार सुरू आहे. अखिल भारतीय औषध विक्रेते व वितरक संघटना पुणेकडून या भूमिकेचे स्वागत केले असून, त्याला पाठिंबा दिला आहे.बनावट कफ सिरपमुळे मध्य प्रदेशात काही बालकांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. अशा घटना टाळण्यासाठी तसेच बनावट औषधे ओळखता यावीत, यासाठी औषधे, लशी यांच्या वेष्टनावर क्यूआर कोड छापल्यास त्या कंपनीविषयी सर्वसामान्यांना माहिती मिळेल. तसेच, औषध मानक यंत्रणांनादेखील उत्पादन, परवानगी, घटक यांबाबत त्वरित माहिती मिळून कारवाई करता येईल. यासाठी भारतीय मुख्य औषध नियंत्रक अधिकारी यांच्याकडून याबाबत विचार सुरू आहे. हा उपक्रम चांगला असल्याची माहिती संघटननेचे अध्यक्ष जगन्नाथ एस. शिंदे आणि सरचिटणीस राजीव सिंघल यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु