हिंगोली, 20 ऑक्टोबर (हिं.स.)।
‘
दैनंदिन जीवनात स्पर्धा परीक्षा द्यायची असो किंवा कोणतेही आव्हान पेलायचे असो, त्यात यश मिळवण्यासाठी मुलांची मराठी व इंग्रजी भाषांवर चांगली पकड आणि लॉजिकल रिजनींग आली पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी 'नन्हे सितारे' या जीवनकौशल्य आधारित उपक्रमाच्या जिल्हास्तरीय अंतिम फेरीच्या समारोपाप्रसंगी केले.
जिल्हा परिषद हिंगोली व ओपन लिंक्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाचा समारोप झाला. यावेळी शिक्षणाधिकारी (योजना) संदीपकुमार सोनटक्के, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, डायटचे प्राचार्य भानुदास पुटवाड आणि ओएलएफचे विभाग व्यवस्थापक चित्रा खन्ना हे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता म्हणाले, जिल्हा प्रशासनाने देखील 30 तासांचा विशेष अभ्यासक्रम डायटच्या मदतीने जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत पोहोचवला आहे. यामध्ये गणित, विज्ञान आणि भाषांचा समावेश आहे. “जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती, जेएनव्ही आणि सैनिक शाळांमध्ये यशस्वी व्हावे अशी आमची इच्छा आहे. हा अभ्यासक्रम वापरण्यास सोपा आहे. जेणेकरून पालकांनाही तो वाचून समजू शकेल आणि ते त्यांच्या मुलांना अभ्यासात मदत करू शकतील. यासोबतच मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनी मुलांना दररोज मैदानावर खेळायला पाठवावे, असे आवाहन केले.
'नन्हे सितारे' उपक्रमाचे उद्दिष्ट केवळ स्पर्धा घेणे नसून, विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्यांचा विकास, आत्मविश्वास वृद्धी आणि सर्जनशील अभिव्यक्तीला योग्य वाव देणे हा आहे. सप्टेंबर महिन्यात सुरू झालेल्या या उपक्रमाला जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर, शालेय व तालुका स्तरावरील प्राथमिक फेऱ्यांमधून निवडलेले एकूण 22 स्पर्धक जिल्हास्तरीय ग्रँड फायनलमध्ये आपली प्रतिभा सादर करण्यासाठी एकत्र आले होते.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे योग्य मूल्यांकन करण्यासाठी शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातील अनुभवी आणि प्रतिष्ठित व्यक्तींनी परीक्षक म्हणून काम पाहिले. स्पोकन इंग्लिश आणि स्पेलिंग बी या स्पर्धांसाठी जिल्हा परिषद शिक्षक पंकज हलगे, हरीश पाटोदकर आणि चंकीकुमार शहाणे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. ‘कथाकथन’आणि ‘कवितावाचन’स्पर्धांसाठी जिल्हा परिषद शिक्षक दीपक कोकरे (कोठलाज दिग्रस क), बबन दांडेकर (सिरसम) आणि राजकुमार मोर्गे (सिद्धेश्वर) यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली.
या स्पर्धेमध्ये चार गटांमध्ये (इयत्ता 1 ते 3, इयत्ता 4 ते 5, इयत्ता 6 ते 8, आणि इयत्ता 9 ते 12 वी) स्पोकन इंग्लिश, स्पेलिंग बी, कथा वाचन आणि कविता वाचन या चार प्रमुख स्पर्धा प्रकारांत विजेत्यांचा गौरव करण्यात आला. स्पोकन इंग्लीश इयत्ता 1 ली ते 3 रीच्या गटामध्ये आजेगाव येथील शौर्य चाटसे पहिला, सवड येथील श्रद्धा घुमडे दुसरा आणि दिग्रस क. येथील आरुषी राखुंडे यांनी तिसरा क्रमांक मिळवला आहे.
स्पोकन इंग्लीश इयत्ता 4 थी ते 5 वी गटामध्ये महागाव येथील रितेश जाधव पहिला व सांडस येथील सौरभ बलखंडे दुसरा क्रमांक मिळवला आहे. इयत्ता 6 वी ते 8 वी गटामध्ये सांडस येथील समरीन शेख ही विजेती ठरली आहे.
स्पेलींग बी इयत्ता 4 थी ते 5 वीच्या गटामध्ये वसमत तालुक्यातील बोरला येथील आर्या कदम, इयत्ता 6 वी ते 8 वीच्या गटामध्ये कळमनुरी तालुक्यातील मोरवड येथील चंद्रकांत मेंढे विजेता ठरला आहे.
कथा वाचन इयत्ता 1 ली ते 3 रीच्या गटामध्ये दिग्रस क. येथील समृद्धी कऱ्हाळे, आंखालीवाडी येथील आराध्या दराडे या विजेत्या ठरल्या आहेत. इयत्ता 4 थी ते 5 वीच्या गटामध्ये सांडस येथील अनिता जाधव, दिग्रस क. येथील चक्रधर कऱ्हाळे विजेते ठरले आहेत. इयत्ता 6 वी ते 8 वीच्या गटामध्ये इडोळी येथील वेदिका जाधव ही विजेती ठरली आहे.
कविता वाचन इयत्ता 1 ली ते 3 रीच्या गटामध्ये वाळू ना. येथील ज्ञानवी वाकोडे, दिग्रस क. येथील अनुष्का कऱ्हाळे व कोळसा येथील श्रेया तोंडे या विजेत्या ठरल्या आहेत. इयत्ता 4 थी ते 5 वीच्या गटामध्ये दिग्रस येथील राधिका शेळके, टाकळखोपा येथील वेदिका कायरे विजेत्या ठरल्या आहेत. इयत्ता 6 वी ते 8 वीच्या गटामध्ये इडोळी येथील तेजल जाधव, साळवा येथील नम्रता कदम विजेती ठरली आहे.
ओपन लिंक्स फाऊंडेशन कम्युनिटीचे विकास व्यवस्थापक विजय वावगे आणि त्यांच्या टीमने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर प्रकल्प व्यवस्थापक रघुनाथ वानखडे, प्रकल्प अधिकारी आशा बस्सी आणि संपूर्ण ओएलएफ टीमच्या सदस्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान दिले.
'नन्हे सितारे' ही स्पर्धा हिंगोली जिल्ह्यात नुकत्याच सुरू झालेल्या “आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रम”या अंतर्गत आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षकांचे सक्षमीकरण करणे आणि नवोपक्रमशील अध्यापनाला चालना देणे हा आहे. ‘विनोबा ॲप’या तंत्रज्ञान मंचाद्वारे शिक्षक आणि प्रशासकांना सहज आणि सोप्या पद्धतीने जोडणी साधणे शक्य झाले आहे. यामुळे जिल्हा प्रशासनासाठी प्रक्रिया सुलभ झाली असून, शिक्षकांना यापूर्वी कधी नव्हे इतकी प्रेरणा मिळाली आहे. 'नन्हे सितारे'सारखा हा अनोखा उपक्रम याच सामूहिक प्रेरणा आणि अध्ययनाच्या प्रक्रियेचा भाग आहे.
ओपन लिंक्स फाउंडेशन “विनोबा कार्यक्रम” अंतर्गत महाराष्ट्र आणि छत्तीसगड या राज्यांतील 35 जिल्ह्यांमध्ये जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभागासोबत कार्यरत आहे. या कार्यक्रमांतर्गत ओएलएफसोबत 53 हजार 132 शाळा आणि 1 लाख 81 हजार 551 शिक्षक जोडले गेले आहेत. सरकारी शाळांना प्रेरणादायी बनवणे, शिक्षकांना प्रोत्साहन देणे आणि तंत्रज्ञान व व्यवहार विज्ञानाच्या साहाय्याने शिक्षण व्यवस्थेची अंमलबजावणी क्षमता वाढवणे, हे ओएलएफचे मुख्य उद्दिष्ट आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis