छत्रपती संभाजीनगर, 20 ऑक्टोबर (हिं.स.)।छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनीकन्नड तालुक्यातील उपोषणकरच्या शेतकऱ्याला छत्रपती संभाजी नगर येथे आपल्या घरी बोलून फळाचा ज्यूस पाजवल्यामुळे मोठा वादंग निर्माण झाला आहे. कन्नड ला न जाता घरी उपोषण सोडवल्यामुळे मंत्री शिरसाट यांच्यावर टीका होत आहे.
कन्नड तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानीबाबत शासनाकडून ठोस मदत मिळावी, तसेच तत्काळ सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, या मागणीसाठी कन्नड तहसील कार्यालयासमोर 10 ऑक्टोबरपासून एका व्यक्तीने सुरू केले होते.हे बेमुदत उपोषण अखेर नवव्या दिवशी छत्रपती संभाजीनगर येथे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरी जाऊन मागे घेतल्याची अजब घटना समोर आली आहे.
त्यामुळे पालकमंत्री संजय शिरसाट यांना शेतकऱ्यांना भेटण्यासाठी आणि उपोषणस्थळी जाण्यास वेळ नव्हता का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कन्नड येथील संदीप विजयकुमार सेठी या व्यक्तीने, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पंजाब सरकारप्रमाणे सरसकट नुकसानभरपाई द्यावी, यासह इतर मागण्यांसाठी उपोषण केलं होते. तहसीलदारांसह अन्य अधिकाऱ्यांनी सेठी यांना उपोषण मागे घेण्यासाठी विनंती केली. परंतु त्यांनी पालकमंत्री संजय शिरसाट जोपर्यंत उपोषणस्थळी येऊन आश्वासन देणार नाहीत, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका सेठी यांनी घेतली होती.
त्यांनतर तहसीलदार विद्याचरण कडवकर व शिवसेनेचे उपसंघटक शिवाजी थेटे यांनी पालकमंत्री शिरसाट यांच्या सहायकांशी संपर्क साधला. यावेळी पालकमंत्र्यांचे बिझी शेड्युल आहे. त्यामुळे त्यांना कन्नडला येणे शक्य नाही, असे सांगण्यात आले. उपोषणकर्त्यांनाच इकडे छत्रपती संभाजीनगरला पालकमंत्र्यांच्या घरी आणा. इथेच उपोषण सोडवू, असा निरोप देण्यात आला. त्यानंतर एका रुग्णवाहिकेमध्ये उपोषणकर्ते संदीप सेठी हे डॉक्टर आणि काही कार्यकर्त्यांसह छत्रपती संभाजीनगरला रवाना झाले.तहसीलदार, पोलिस अन् उपोषणकर्ते पोहोचले दारात पोचले यावेळी शिरसाट यांनी उपोषणकर्ते सेठी यांना मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर सेठी शिरसाट यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण मागे घेतले.
या सगळ्या प्रकारामुळे पालकमंत्री संजय शिरसाट पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. छत्रपती संभाजीनगर ते कन्नड हे अंतर अवघ्या पाऊण तासाचे आहे. तरीही संजय शिरसाट तिकडे का गेले नाही, असा सवाल निर्माण झाला आहे. तसेच संजय शिरसाट यांनी सेठी यांना रात्री साडेनऊ-दहा वाजता उपोषण सोडण्यासाठी बोलवून घेतले. मला पालकमंत्र्यांनी बोलावून घेतल्याचे सेठी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. यामुळे शेतकऱ्यांविषयी सरकार इतक्या असंवेदनशीलपणे कसे वागू शकते, अशी चर्चा रंगली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis