धाराशिव ,२0 ऑक्टोबर (हिं.स.)।
दिवाळीच्या आनंदोत्सवात सगळीकडे प्रकाश आहे, पण धाराशिव जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या घरात मात्र अंधाराचे सावट दाटलेले आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होऊन त्यांच्या घरी दिवाळीच्या दिव्याचा अभाव निर्माण झाला आहे..
अशा कठीण काळात माजी सैनिक सुभेदार श्री. शिवाजीराव सरडे यांदनी दाखवलेली माणुसकी समाजासाठी एक प्रेरणादायी दीप ठरली आहे..
कळंब तालुक्यातील गंभीरवाडी येथील शेतकरी श्री. संपत महेंद्र खोचरे हे केवळ ९० गुंठे जमिनीवर शेती करत संसार चालवतात. परंतु आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने ७० गुंठे जमिनीत पेरणी करू शकले नाहीत, त्यांनी केवळ २० गुंठ्यात पेरणी केली होती. पण ऑगस्ट-सप्टेंबरमधील अतिवृष्टीने ते पिकसुद्धा वाहून गेले. एक मुलगा आणि एक मुलगी दोघंही शिक्षण घेत आहेत; पण घरात दिवाळीचा दिवासुद्धा लावता येणार नाही, एवढी बिकट परिस्थिती निर्माण झाली होती..
दरम्यान, धाराशिव शहरातील सांजा रोड येथील माजी सैनिक सुभेदार श्री. शिवाजीराव सरडे यांनी वृत्तपत्रात ही बातमी वाचली, देशासाठी आयुष्यभर झटलेल्या सुभेदार सरडेंच्या मनाला ही गोष्ट असह्य झाली, त्यांनी त्याच दिवशी या शेतकरी कुटुंबाला मदत करण्याचा निश्चय केला..
यासाठी त्यांनी या शेतकऱ्याच्या घरी मी फुल नाही, पण फुलाची पाकळी समजून आनंद नेऊ इच्छितो, असे सांगत त्यांनी आपल्या ५० हजारांच्या पेन्शनमधून घर खर्च वगळता उरलेल्या रकमेपैकी दिवाळीसाठी मुलांकरीता ₹१०,००० आणि कुटुंबासाठी ₹२५,०००, अशी एकूण ₹३५,००० रुपयांची मदत करण्याचा निर्णय शिवसेना आमदार कैलास पाटील यांच्याकडे व्यक्त केला..
सुभेदारांची ही भावना ऐकून आमदार पाटील यांच्या मनालाही तीव्र स्पर्श झाला, माणुसकीची ही ज्योत अजून तेजोमय व्हावी या हेतूने, आमदार पाटील यांनी त्यात ₹५०,००० रुपयांची भर घालण्याचा निर्णय घेतला.यामुळे एकूण ८५,००० रुपयांची मदत आज, सुभेदार सरडेंच्या हस्ते श्री.संपत खोचरे यांच्या कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आली..
जेव्हा सुभेदारांनी या कुटुंबाच्या हातात मदतीचा निधी दिला, तेव्हा त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले, त्या क्षणी जाणवलं हीच खरी दिवाळी आहे..
माजी सैनिक सुभेदार श्री. शिवाजीराव सरडे यांच्या संवेदनशील मनाला व माणुसकीच्या तेजस्वी दीपाला मनापासून सलाम! असे आमदार पाटील म्हणाले
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis