बीड, 20 ऑक्टोबर (हिं.स.)।
परळी वैजनाथ तालुक्यातील बोधेगाव येथील नाथ प्रतिष्ठान व जिल्हा परिषद बीड यांच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे, जल जीवन मिशन योजनेचे, गावातील हनुमान मंदिर सभागृह यासह विविध विकास कामांचे लोकार्पण माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांशी संवाद साधताना मागील काही दिवसात आलेल्या विविध अडचणींचा सामना करताना परळी वैद्यनाथ मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचे आशीर्वाद हेच माझे पाठबळ आहे व त्याच आशीर्वादांच्या शक्तीच्या बळावर पुन्हा नवी उभारी घेऊ असा विश्वास आमदार धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.
परळी मतदारसंघात ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांच्या विकासावर आपण भर दिलेला असून आगामी काळात आणखी मोठी विकासकामे हाती घ्यायची आहेत. नागपिंपरी येथील सब स्टेशन, प्रलंबित पुलाचे काम यासह विविध साठवण तलावांच्या कामांची आगामी काही दिवसात सुरुवात होणार आहे.
याप्रसंगी ग्रामस्थांनी केलेल्या विविध मागण्या मान्य करून त्याही शब्दांची लवकरच पूर्तता करू असे सांगत सर्वांना दीपावली पर्वाच्या शुभेच्छा दिल्या...
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis