अमरावती, 20 ऑक्टोबर (हिं.स.)
दिवाळीनिमित्त अमरावती जिल्ह्यात सर्वत्र मंगलमय वातावरण आणि उत्साह दिसून येत आहे. शहराच्या विविध ठिकाणच्या प्रमुख बाजारपेठांमध्ये रविवारी खरेदीसाठी ग्राहकांची अक्षरश: झुंबड उडाल्याचे पाहायला मिळाले. दुकानदारांनी दिलेल्या विविध सवलती आणि भेटवस्तूंच्या आकर्षक ऑफर्सचा त्यांनी लाभ घेतला.
यंदा पारंपरिक आणि आधुनिकतेचा संगम असलेल्या भेट वस्तूंचा ट्रेंड आहे. पर्यावरणपूरक वस्तूंना प्रचंड मागणी असून मातीचे दिवे, मातीच्या मूर्ती, सुगंधी कँडेल्स, सजावटीच्या वस्तूंना मागणी वाढली आहे. हस्तकलेच्या वस्तूंसह स्मार्टवॉच, ब्लू टूथ स्पीकर, स्मार्ट-लॅम्प, मोबाइल, टॅब यांची खरेदी झाल्याने बाजारात मोठी उलाढाल झाल्याचे व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
खरेदी करताना यंदा अनेकांनी पारंपरिकतेसोबत आधुनिकता, पर्यावरणपूरकता आणि स्थानिक उद्योगांना साथ देण्याचा विचार केल्याचे दिसून आले.
ऑनलाइन खरेदीत वाढ
ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरही विविध वस्तूंवर मोठी सवलत मिळत असल्याने ऑनलाइन खरेदीचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची मागणी वाढली आहे. विविध कंपन्यांनी आकर्षक सवलती दिल्याने त्याचा लाभ ग्राहक घेत आहेत. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर कस्टमाइज्ड आणि वेलनेस हॅम्पर्सची मोठी विक्री होत आहे. वैयक्तिक फोटो, नाव किंवा संदेश असलेले ‘पर्सनलायझ्ड गिफ्ट्स’, तसेच हर्बल प्रॉडक्ट्स आणि स्पा किट्स यांना मोठी मागणी आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी