सोलापूर, 20 ऑक्टोबर (हिं.स.) डिस्टिलरी, इथेनॉल निर्मितीमुळे साखर कारखान्यास नवे आयाम मिळाले आहे. यामुळे साखरेचे दर टिकून राहिले आहेत. उसाचे घटक वाया जात नाहीत, उसापासून 14 प्रकारचे घटक मिळतात, यामुळे ऊस हा कल्पवृक्ष आहे, असे प्रतिपादन माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केले.
गंगामाई नगर पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या 25 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ माजी आ.प्रशांत परिचारक यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून करण्यात आला. यावेळी झालेल्या भव्य शेतकरी मेळाव्यात माजी आ. परिचारक बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आ. संजयमामा शिंदे हे होते.
आ. प्रशांत परिचारक म्हणाले, बबनराव शिंदे यांनी लोकांसाठी प्रचंड कष्ट करुन तालुका सुजलाम-सुफलाम केला. संपूर्ण हयात घालविली. आयुष्यातील प्रत्येक क्षण शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी घालविला..स्वतःच्या आजाराकडे ही लक्ष दिले नाही यामुळे त्यांच्याप्रति कृतज्ञता बाळगणे ही आपली जबाबदारी आहे, असे परिचारक म्हणाले. प्रास्ताविक जिल्हा दूध संघाचे माजी चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड