पुणे, 20 ऑक्टोबर (हिं.स.)जिल्ह्यात काही ठिकाणी एकाच गावात नदी, ओढ्यांना दोनवेळा पूर आल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ऑगस्टमध्ये झालेल्या नुकसानीचा पंचनामा झाल्यानंतर पुन्हा सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचा शिल्लक राहिलेला घासही हिरावून घेतला. दोनवेळा नुकसान झाले असले तरी पंचनामे हे एकदाच करण्यात आल्याने नुकसान भरपाई ही एकदाच मिळणार असल्याचे प्रशासनाकडून शेतकऱ्यांना उत्तर देण्यात येत आहे.
रब्बी हंगाम जोमात असतानाच ऑगस्ट महिन्यात इंदापूर भागात जोरदार पाऊस झाला. ओढ्या, नाल्यांना पूर आल्याने जमीन खरवडून जाण्याबरोबरच उभ्या पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर प्रशासनाकडून तातडीने पंचनामे करण्याचे काम हाती घेतले. पंचनामे पूर्ण होऊन राज्य सरकारकडून नुकसान भरपाईसाठी निधीही मंजूर केला.
मात्र, त्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या अखेरीला पुन्हा पावसाने झोडपले, यामध्ये शिल्लक राहिलेले पीकही आणि त्याचबरोबर इतर ही नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले. याबाबत इंदापूरचे विश्वासराव निंबाळकर म्हणाले, ‘‘आमच्या शेतातील पिकांना दोनवेळा पुराचा फटका बसला. दुसऱ्यांदा झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला नाही. केवळ पाहणी करण्यात आली. पहिल्या नुकसान भरपाईच्या यादीत नाव आहे. दुसऱ्यांदा पंचनामा करण्यात येणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.’
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु