अमरावती, 20 ऑक्टोबर (हिं.स.)
महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक पक्षाने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे. उबाठा शिवसेनेकडून सुद्धा शुल्कासह अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हाप्रमुखांकडून करण्यात आले होते. मात्र शुल्क जमा करण्याच्या कारणावरून शिवसेनेमध्ये मतेमतांतरे दिसून आली.एकीकडे स्थानिक पातळीवरून शुल्कासह अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले तर दुसरीकडे मात्र वरिष्ठ स्तरावरून निःशुल्क अर्ज जमा करा असे आदेश देण्यात आले. शिवसेना जिल्हाप्रमुखांकडून महापालिका निवडणुकीकरिता शुल्कासह उमेदवारी अर्ज जमा करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानुसार अर्ज वाटप करण्यात आले मात्र माहितीनुसार वरिष्ठ स्तरावरून इच्छुक उमेदवारांकडून शुल्क घेऊ नका, निःशुल्क अर्ज भरून घ्या असे आदेश देण्यात आलेत. त्यामुळे जिल्हा प्रमुखांच्या आदेशावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. वरिष्ठांच्या आदेशानंतर मात्र जिल्हाप्रमुखांनीसुद्धा इच्छुक उमेदवारांना अर्ज सादर करताना शुल्क अदा करू नये असे मेसेज सोशल मीडियाच्या माध्यमातून वितरित केले. प्राप्त माहितीनुसार स्थानिक जिल्हाप्रमुखांनीसुद्धा त्यांच्या उपनेत्यांना विचारून कुणीही इच्छुक म्हणून अर्ज सादर करेल याकरिता नाममात्र शुल्क ठेवले होते. अन्य पक्षाच्या वतीने सुद्धा शुल्क घेण्यात आले. मात्र वरिष्ठांच्या आदेशानंतर मात्र पुन्हा निःशुल्क अर्ज सादर करण्याचे आदेश देण्यात आल्याने आता शिवसेनेमध्ये इच्छुक उमेदवारांची भरमार असल्याचे दिसून येईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी