पुणे, 20 ऑक्टोबर (हिं.स.)उत्तर प्रदेशमधून वीट भट्टीच्या कामावर आणलेल्या मजुरांचा मुकादम वीटभट्टी मालकांचे उचलीचे पैसे घेऊन गेला. त्यामुळे मालकाने २० मजूर व त्यांची १२ लहान मुले अशा एकूण ३२ जणांना नजरकैदेत ठेवले होते. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त झालेल्या तक्रारीवरून इंदापूर तहसील व पोलिस प्रशासनाने संबंधित मजूर आणि बालकांची नजर कैदेतून सुटका केली.
याप्रकरणी मुकादम असलेल्या वेदप्रकाश (पूर्ण नाव-पत्ता माहीत नाही) तसेच वीटभट्टी मालक सचिन अशोक शिंदे (रा. इंदापूर), कुमार गोकूळ दिवसे (रा. नरूटवाडी, ता. इंदापूर) आणि राहुल नारायण शेटे (रा. भांडगाव, ता. इंदापूर) या चार जणांच्या विरोधात इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत नजर कैदेत ठेवलेल्या मजुरांच्या नातेवाइकांनी उत्तर प्रदेशच्या जिल्हाधिकारी व कामगार आयुक्त तसेच जनसाहस या संस्थेला कळविल्यानंतर त्यांच्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार वरील कारवाई करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु