नाशिक, 22 ऑक्टोबर, (हिं.स.)। फॅमिली फिजिशियन्स असोसिएशन व नामको हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने श्री धन्वंतरी पूजन व श्री धन्वंतरी पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात झाला.
व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रसिद्ध कर्करोगतज्ज्ञ डॉ. नागेश मदनूरकर, एफपीए. नाशिकच्या अध्यक्ष डॉ. शीतल सुरजुसे, सचिव डॉ. विजय मुंदडा, तसेच प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. चंद्रतेज कदम, डॉ. अभिजित सोनावणे, डॉ. पल्लव कपूर, डॉ. निखिल कुलकर्णी, नामको हॉस्पिटलचे जनरल मॅनेजर अॅडमिनिस्ट्रेशन समीर तुळजापूरकर, मेडिकल सुप्रिटेंडंट डॉ. विशाखा जहागीरदार उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. अजय भन्साळी यांनी सादर केलेली गणेशवंदना, दीपप्रज्वलन व श्री धन्वंतरी पूजन करून करण्यात आली. डॉ. तेजू सोलोमन यांनी सुमधुर आवाजात श्री धन्वंतरी स्तवन सादर केले. प्रमुख पाहुण्यांचा व इतर मान्यवरांचा सत्कार संघटनेचे पदाधिकारी, माजी अध्यक्ष व संघटनेच्या ज्येष्ठ सदस्यांच्या हस्ते पार पडला. सन २०२५ चा श्री धन्वंतरी पुरस्कार ज्येष्ठ चिकित्सक व संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ. गुलाब घरटे व सल्लागार समिती सदस्य डॉ. स्मिता कांबळे यांना प्रदान करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV