अमरावती, 22 ऑक्टोबर, (हिं.स.) पन्नालाल नगर येथील वीर अभिमन्यू क्रीडा मंडळाच्यावतीने दीपावलीनिमित्त पारंपरिक पद्धतीने मैदानाचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे नेतृत्व मिलिंद बांबल यांनी केले. स्थानिक खेळाडूंमध्ये एकता, अनुशासन आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही मैदान पूजनाचा उपक्रम राबवण्यात आला.
या पूजन सोहळ्यात परिसरातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दीपावलीचा सण उत्साहात साजरा करत असताना खेळाडूंनी मैदान आणि खेळांप्रती आपली निष्ठा दाखवत आदरांजली अर्पण केली. कार्यक्रमात क्रीडा क्षेत्रातील विविध मुद्द्यांवर चर्चा झाली आणि युवकांनी संघटन व नियमित सरावाचे महत्त्व अधोरेखित केले.
मिलिंद बांबल यांनी मार्गदर्शन करताना खेळाडूंनी मैदानाचे जतन करणे, संघभावना जपणे आणि शरीरासोबत मन देखील मजबूत ठेवण्याचे महत्त्व विशद केले. अशा उपक्रमामुळे खेळाडूंमध्ये चैतन्य निर्माण होते, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी