अमरावती, 22 ऑक्टोबर (हिं.स.)।
दीपोत्सवातील महत्त्वाचा दिवस असलेल्या लक्ष्मीपूजनाचा विधी मंगळवारी मांगल्यदायी व भक्तिपूर्ण वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. घरोघरी तसेच व्यापारी पेठांमध्ये लक्ष्मी, कुबेर आणि गणेशपूजन करून समृद्धीची कामना करण्यात आली. दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत, सायंकाळी सहा ते साडेआठ आणि रात्री साडेदहा ते बारा अशा मुहूर्तावर लक्ष्मीपूजन करण्यात आले. पूजाविधीसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये सकाळपासून मोठी गर्दी झाली होती. सायंकाळी नेत्रदीपक रोषणाई व आतषबाजीने अमरावती शहराचं नव्हे तर संपूर्ण जिल्हा उजळून गेला होता.
मंगळवारी सकाळपासूनच शहरात मांगल्याचे वातावरण पसरले होते. घरोघरी स्वच्छता, रांगोळ्यांचे सुंदर गालिचे, दरवळणार्या उदबत्त्या आणि झगमगत्या पणत्यांच्या प्रकाशात अंगण उजळून गेले होते. व्यापारी वर्गानेही दुकानांमध्ये सजावट करून लक्ष्मीमातेचे पूजन केले. लहान मुलांचा उत्साह ओसंडून वाहत होता. रात्री उशिरापर्यंत आसमंत नेत्रदीपक आतषबाजीने फुलून गेला. बाजारपेठांमध्ये सकाळपासूनच नागरिकांची गर्दी उसळली होती. शहरातील प्रत्येक चौकातच झेंडूची फुले, माळा, नारळ, कलश, बेंडबत्तासे, चुरमुरे, तसेच लक्ष्मी-कुबेर प्रतिमा, विड्याची पाने, आंब्याचे डहाळे, पाच फळांचा संच, कर्दळी, केळीची पाने यांना मोठी मागणी होती. लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तासाठी सर्वत्र तयारीचा उत्साह जाणवत होता.दिवाळीच्या निमित्ताने शहरातील नागरिकांनी आपल्या घरांची आणि आंगणांची सजावट विविध प्रकारच्या दिव्यांनी, कंदिलांनी आणि माळांनी केली आहे. रात्रीच्या वेळी हे दृश्य अत्यंत मोहक दिसत आहे. शहरातील मुख्य चौक, बाजारपेठा, मंदिर परिसर आणि इतर सार्वजनिक ठिकाणी विशेष रोषणाईने सजवण्यात आली आहे.
प्रत्येक रस्त्यावर आणि इमारतींवर लावलेली आकर्षक रोषणाई लक्ष वेधून घेत आहे. नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडून ही सजावट आणि आतषबाजीचा आनंद घेत आहेत. विशेषतः लहान मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी