परभणी, 22 ऑक्टोबर (हिं.स.)। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) राज्य उपाध्यक्ष म्हणून पंडित टोमके यांच्या नियुक्तीनंतर परभणी येथे त्यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी बोलताना पंडित टोमके यांनी समाजबांधवांना आवाहन केले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष स्थापन केला. त्यामुळे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी सर्वांनी या पक्षात सहभागी व्हावे. राष्ट्रीय नेते डॉ. राजेंद्र गवई यांच्या नेतृत्वाखाली जनतेने एकत्र येऊन विकास साधावा आणि बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने अभिवादन करावे.”
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर हा सत्कार सोहळा पार पडला. ठाणे येथे पंडित टोमके यांची राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल हा सत्कार रिपाइंच्या जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे आयोजन संदिपान गालफाडे आणि भुषण मोरे (जिल्हा उपाध्यक्ष, आरपीआय) यांनी केले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पंडित टोमके यांचा पुष्पहार घालून सत्कार केला. कार्यक्रमाला संदिपान गालफाडे (जिल्हा सरचिटणीस), एस. पी. शिवभगत (डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण), तसेच शहराध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष आदींची उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis