अमरावती, 22 ऑक्टोबर (हिं.स.)निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबांच्या भुकेलेल्यांना अन्न या संदेशानुसार, महाराष्ट्रातील श्री संत गाडगे महाराज मिशन धर्मशाळा ट्रस्ट, दादर-मुंबई यांच्या माध्यमातून बिहार राज्यातील मुजफ्फरपूर येथे सुरू करण्यात आलेल्या टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये कर्करोगग्रस्त रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी अन्नछत्राची (मोफत भोजन सेवा) सुरुवात दिवाळीच्या शुभमुहूर्तावर करण्यात आली. मुंबईतील टाटा हॉस्पिटलमध्ये यापूर्वीपासून दररोज 1000 ते 1200 रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोफत भोजन दिले जाते. या कार्याची व्याप्ती वाढवत आता मुजफ्फरपूर येथेही ही सेवा सुरू करण्यात आली आहे. बिहारमध्ये दररोज 450 ते 500 रुग्ण उपचारासाठी येतात. त्यांना दोन वेळचे पौष्टिक व स्वच्छ भोजन आणि नाश्ता उपलब्ध करून देण्यात येतो.या सेवेसाठी प्रशांत देशमुख (व्यवस्थापक, ट्रस्ट) यांनी विशेष परिश्रम घेतले असून, मुंबईतील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने अन्नछत्र चालवले जाणार आहे. याशिवाय, भविष्यात सुसज्ज धर्मशाळा, आर्थिक मदत, आणि रुग्ण पुनर्वसन यांसारखी सेवाही उपलब्ध करून देण्याचा ट्रस्टचा मानस आहे, अशी माहिती ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त बापूसाहेब देशमुख यांनी दिली. याचबरोबर, भविष्यात भागलपूर, दरभंगा, पूर्णिया, आरा यांसारख्या ठिकाणीही टाटा मेमोरियलच्या माध्यमातून भव्य 1000 कोटी रुपये खर्चून कॅन्सर रुग्णालये उभारण्यात येणार असून, त्या ठिकाणीही संत गाडगे महाराज ट्रस्टच्या माध्यमातून मोफत भोजन व स्वस्त दरात निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी