समाजाच्या सुरक्षेत पोलिस दलाचे योगदान अमूल्य - न्या. श्रीचंद जगमलानी
नाशिक, 22 ऑक्टोबर (हिं.स.) - समाजाच्या सुरक्षेसाठी पोलीस दलाचे योगदान अमूल्य आहे. त्यांच्या त्यागाची देश नेहमीच आठवण ठेवेल, असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी यांनी केले. आपल्या देशासाठी आपले कर्तव्य बजावत असताना प्राणांची आहुती
समाजाच्या सुरक्षेत पोलिस दलाचे योगदान अमूल्य न्या. जगमलानी :


नाशिक, 22 ऑक्टोबर (हिं.स.) - समाजाच्या सुरक्षेसाठी पोलीस दलाचे योगदान अमूल्य आहे. त्यांच्या त्यागाची देश नेहमीच आठवण ठेवेल, असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी यांनी केले. आपल्या देशासाठी आपले कर्तव्य बजावत असताना प्राणांची आहुती दिलेल्या शहीद पोलिस बांधवांच्या स्मृतींना उजाळा देतांना उपस्थित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

बिगुलच्या करुण सुरांनी निनादलेले पोलीस कवायत मैदान, साश्रू नयनांनी आपल्या वीर सुपुत्रांना मानवंदना देणारे कुटुंबीय आणि स्तब्ध झालेले हजारो नाशिककर... अशा भावविवश वातावरणात नाशिकमध्ये पोलीस स्मृती दिनाचा कार्यक्रम पार पडला. देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या पोलीस शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा कार्यक्रम पोलीस कवायत मैदानावर आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी आणि नाशिकचे पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी शहीद स्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. 'लास्ट पोस्ट'च्या धूनने उपस्थितांचे मन द्रवले.

दोन मिनिटांच्या मौनाने हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी शहीद पोलीस बांधवांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, त्यांच्या शौर्याची प्रेरणा घेऊन पोलीस दल अधिक सक्षमपणे आपली जबाबदारी पार पाडेल, असा विश्वास पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमास शहीद जवानांचे कुटुंबीय, पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम केवळ एक औपचारिकता नव्हता, तर त्याग, शौर्य आणि कृतज्ञतेचा एक अविस्मरणीय क्षण ठरला.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande