अमरावती : ग्रामीण भागात मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीची धामधूम
अमरावती, 22 ऑक्टोबर (हिं.स.)। जिल्हा परीषदेची ओळख मिनी मंत्रालय म्हणूनच आहे. मिनी मंत्रालयावर जाण्यासाठी गावकुसातील कारभारी, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी कंबर कसली असुन हवसे, नवसे, गवसे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. ग्रामीण भागात गेल्य
अमरावती : ग्रामीण भागात मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीची धामधूम


अमरावती, 22 ऑक्टोबर (हिं.स.)।

जिल्हा परीषदेची ओळख मिनी मंत्रालय म्हणूनच आहे. मिनी मंत्रालयावर जाण्यासाठी गावकुसातील कारभारी, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी कंबर कसली असुन हवसे, नवसे, गवसे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. ग्रामीण भागात गेल्या सहा महिन्यापासून अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी देशोधडीला लागला आहे. आता रब्बी पूर्व मशागतीचा हंगाम असून ते करायलाही पाऊस ऊसंत द्यायला तयार नाही.

शेतकऱ्यांना विम्याची रक्कम अद्यापही खाती पडलेली नाही, अनुदानाची तुटपुंजी रक्कम खात्यावर पडली असली तरी त्याला अनेक कात्रीची किनार लागलेली आहे. शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नांना बगल देण्याचा प्रयत्न कार्यवते, पदाधिकाऱ्यांपासूनही होताना दिसून येतो आहे. दुसरीकडे मिनी मंत्रालयात जाण्यासाठी जिल्हा परीषद गट व पंचायत समिती गणामध्ये निवडणुकीला उभे राहण्यासाठी निवडणूक घोषीत होण्यापूर्वीच अनेकांची लगीन घाई सुरू झाली आहे. सर्वच पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते निवडणुकीला उभे राहण्यासाठी आतापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधलेले आहेत. जिकडे तिकडे सध्या जिल्हा परीषद व पंचायत समिती निवडणुकीची चर्चा सुरू आहे.

गावकुसातील मंदिरे, चावडीवर निवडणुकीच्या चर्चेला आले उधाण

अमरावती जिल्ह्यातील अनेक तालुक्यात गाव, वाडी, वस्ती, तांड्यावर गावातील मंदिरे, चावडी व ओट्यावर जिकडे तिकडे जिल्हा परीषद व पंचायत निवडणुकीचे वारे जोरात वाहत असून त्यानिमित्ताने राजकीय चर्चाना ऊत आले आहे आहे.निवडणुकीत उभे राहण्याचे अनेकांना वेध लागले आहे. अनेकजण निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यासाठी पुढे सरसावले आहेत. आपणच पक्षाकडून अधिकृत उमेदवार असल्याचे सांगत आहेत.

सोशल मीडिया, फेसबुक, बॅनरबाजीतून मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न

तालुक्यातील गाव, वाडी, वस्ती, तांड्यावर लहानापासून ते आबाल वृध्दापर्यंत जिकडे तिकडे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत कोण उभा राहणार, त्याच्या विरोधात कोण असणार आहे. कोण निवडून येणार. कोणत्या पक्षाचे निवडणुकीत पारडे जड असणार आहे. जिल्हा परीषद कोणाच्या ताब्यात जाणार अशी चर्चा ऐकायला मिळत आहेत. पंचायत समिती गणात सर्वच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते जोरात निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. दीपावली सणाच्या निमित्ताने मतदारांच्या भेटीगाठी घेणे जोरात सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande