येवला, 22 ऑक्टोबर (हिं.स.)। विजेचा तीव्र धक्का लागल्याने एरंडगाव (ता. येवला) येथील दिनेश नामदेव जगताप (वय ४०) या तरुणाचा मृत्यू झाला. ऐन लक्ष्मीपूजनच्या दिवशी घडलेल्या या घटनेने ग्रामस्थांकडून दुःख व्यक्त केले जात आहे.
दिनेश याने विजयादशमीच्या दिवशी वाहने धुण्याचे सर्व्हिस स्टेशन सुरू केले होते. काल लक्ष्मीपूजनच्या दिवशी वाहने धुण्यासाठी त्याच्या सर्व्हिस स्टेशनवर दिवसभर मोठी गर्दी झाली होती. सायंकाळी पाच वाजता अचानक पावसाला सुरुवात झाली. वाहने धुण्यासाठी त्याच्या सर्व्हिस स्टेशन जवळच असलेल्या विहिरीवर त्याने पाणी उपसण्याची मोटर लावली होती. पावसात मोटर काढण्यासाठी तो गेला. मात्र त्याच वेळी विजेचा तीव्र धक्का बसल्याने दिनेशचा जागेवरच मृत्यू झाला. त्याला लगेच दवाखान्यात नेले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
गावावर शोककळा पसरली. गावात कुणीही दिवाळी सण साजरा केला नाही. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, दोन भाऊ, एक बहीण असा परिवार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV