सोलापूर, 22 ऑक्टोबर, (हिं.स.)। विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळे महायुतीची राज्यात सत्ता आली. त्या लाडक्या बहिणींची नाराजी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला परवडणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींची ‘ई-केवायसी’ची प्रक्रिया तूर्तास थांबविली आहे. ऑक्टोबरचा लाभही पुढील आठवड्यात दिला जाणार आहे.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला २८ जून २०२४ रोजी मान्यता दिली. जुलै २०२४ पासून योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. १५ ऑक्टोबर २०२४ च्या मुदतीत राज्यभरातून दोन कोटी ५६ लाख महिलांनी योजनेसाठी अर्ज केले. पण, सहा महिन्यांनी निकषांवर बोट ठेवत योजनेच्या लाभार्थींची पडताळणी सुरू झाली.पहिल्यांदा चारचाकी वाहने असलेल्या महिला, केंद्र व राज्य सरकारच्या वैयक्तिक योजनांचे लाभार्थी, सरकारी नोकरदार महिला, एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त लाभार्थी महिलांचा शोध घेण्यात आला. याशिवाय चुकीचे वय दाखवून किंवा वय कमी-अधिक असताना देखील योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचाही त्यात समावेश होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड