सोलापूर, 22 ऑक्टोबर (हिं.स.)। दिवाळी पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी व महापुरामुळे बाधित झालेल्या बळिराजाच्या बॅंक खात्यात भरपाई जमा होण्यास सुरवात झाली. चार लाख बाधित शेतकऱ्यांची नावे शासनाकडे अपलोड झाली आहे. त्यांच्या खात्यात ५०० कोटी रुपयांची भरपाई जमा होण्याची शक्यता आहे.जून ते ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यातील पावसामुळे शेतकऱ्यांचे शिवार खरडून गेले. उरली सुरली आशा देखील अतिवृष्टी व महापुरामुळे मावळली. संपूर्ण जिल्ह्यातील सहा लाख चार हजार ६४१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यात सात लाख ६४ हजार १७३ शेतकरी बाधित झाले. संकटातील शेतकऱ्यांसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला. मदतीसाठी दोन हेक्टरची मर्यादा तीन हेक्टरपर्यंत वाढविली. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यासाठी ८६७ कोटी ३९ लाख रुपयांचा निधी मिळाला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड