रत्नागिरी, 23 ऑक्टोबर, (हिं. स.) : कोकणातील अग्रगण्य आणि शिक्षण परंपरेने समृद्ध असलेल्या चिपळूणच्या परशुराम एज्युकेशन सोसायटीचा १०७ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.
कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनीचे प्राचार्य मिलिंद नाईक आणि पर्यवेक्षिका सौ. रागिणीताई नाईक उपस्थित होत्या. पोफळी शाळेच्या सौ. धुमाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या ईशस्तवन व स्वागतगीताने कार्यक्रमाला भक्तिरसपूर्ण सुरुवात झाली.
पोफळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वप्नाली पाटील यांनी प्रास्ताविक केले. संस्थेच्या समृद्ध वाटचालीचा गौरवशाली इतिहास ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून सादर करण्यात आला. पाहुण्यांचा परिचय महेंद्र कापडी आणि सौ. स्वप्नाली पाटील यांनी करून दिला. संस्थेचे कार्याध्यक्ष मकरंद जोशी यांच्या हस्ते मान्यवरांचा पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात गुरुतुल्य कै. गोवंडे सर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा “आदर्श शिक्षक पुरस्कार” अलोरे हायस्कूलचे सहायक शिक्षक चंद्रकांत राठोड यांना प्रदान करण्यात आला. शाल, सन्मानपत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. शिक्षक म्हणून केलेल्या कामाचा आणि अनुभवांचा हृदयस्पर्शी आढावा श्री. राठोड यांनी यावेळी घेतला.मिलिंद नाईक यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केले. शिक्षकांनी सतत शिकत राहिले पाहिजे, देशभरातील चांगल्या शैक्षणिक संकल्पना आत्मसात केल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण देणे अत्यंत आवश्यक आहे. पुस्तक हे सर्वस्व नाही. ते फक्त माध्यम आहे; अनुभवाधिष्ठित शिक्षणच खरी प्रगती घडवते, असे त्यांनी सांगितले.
संस्थेचे कार्याध्यक्ष मकरंद जोशी यांनी संस्थेच्या शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेतला. नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर संस्थेमार्फत शिक्षकांसाठी राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. पर्यावरणपूरक जीवनशैली विकसित करणारे कार्यक्रम ही काळाची गरज असून, संस्थेचे प्रयत्न त्या दिशेने सुरू राहतील, असे त्यांनी सांगितले.पोफळी हायस्कूलचे कलाशिक्षक प्रथमेश विचारे यांनी भगवान परशुरामांची आकर्षक रांगोळी साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सूत्रसंचालन प्रदीपकुमार यादव यांनी समर्थपणे केले, तर खडपोली शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वीणा चव्हाण यांनी आभार मानले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी