रत्नागिरी, 23 ऑक्टोबर, (हिं. स.) : चिपळूणमध्ये येत्या १ आणि २ नोव्हेंबरला अभिनय कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून प्रसिद्ध कास्टिंग डिरेक्टर रोहन मापुस्कर मार्गदर्शन करणार आहेत. मराठी नाट्य परिषदेच्या चिपळूण शाखेने या कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
अभिनयाची आवड असलेल्या तरुणांना आणि इच्छुकांना सिनेसृष्टीत काम करण्याची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी या दोन दिवसांच्या अभिनय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कास्टिंग डिरेक्टर रोहन मापुस्कर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा पार पडणार आहे. मुंबई आणि पुण्यात अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर कोकणात प्रथमच ही कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे चिपळूण शाखाध्यक्ष अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी दिली.
ही कार्यशाळा १ आणि २ नोव्हेंबर रोजी दुपारी २ ते सायंकाळी ८ या वेळेत इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात होणार आहे. कॅमेरा फेसिंग तंत्रज्ञान, ऑडिशन मार्गदर्शन, अॅक्टिंग इम्प्रोवायजेशन तसेच भरपूर प्रात्यक्षिक सत्रांचा कार्यशाळेत समावेश आहे. कार्यशाळेसाठी वयोमर्यादा १५ वर्षांपासून अशी ठेवण्यात आली असून कार्यशाळेचे शुल्क एक हजार रुपये आहे. सहभागासाठी मर्यादित जागा असल्याने इच्छुकांनी लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
मार्गदर्शक रोहन मापुस्कर ‘थ्री इडियट्स’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या लोकप्रिय हिंदी चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून कार्यरत होते. ‘एप्रिल-मे ९९’ या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. ‘झोंबिवली’, ‘स्माइल प्लीज’, ‘वाळवी’, ‘वेड’, ‘ठाकरे’, ‘सचिन’, ‘आत्मपॅम्प्लेट’, ‘उनाड’, ‘व्हेंटिलेटर’, ‘हिरकणी’, ‘रूपनगर के चिते’ अशा अनेक मराठी चित्रपटांचे ते कास्टिंग डिरेक्टर आहेत.
कार्यशाळेबाबत अधिक माहितीसाठी योगेश बांडागळे (९९२३४२८८३८) आणि ॲड. विभावरी राजपूत (७७९६७२९५८७) यांच्याशी संपर्क साधावा.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी