अकोला, 23 ऑक्टोबर (हिं.स.)।
अकोला शहरातील गजानन हॉस्पिटलमध्ये आज एक धक्कादायक घटना घडली आहे. उपचारासाठी दाखल असलेल्या एका रुग्णाने हॉस्पिटलच्या वॉर्डमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
मृताचे नाव अमोल हरिचंद्र कावनपुरे (३२, रा. पहाडीपुरा, बनोसा, ता. दर्यापूर, जि. अमरावती) असे असून, ते 18 ऑक्टोबर रोजी पायाच्या उपचारासाठी गजानन हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते.
आज सकाळी सुमारे ९ वाजताच्या सुमारास, नर्सने रुग्णाच्या रूमचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तर तो उघडत नव्हता. त्यानंतर रुग्णाचे नातेवाईक आणि हॉस्पिटल कर्मचारी यांनी दरवाजा तोडून उघडला असता, अमोल कावनपुरे यांनी दुपट्ट्याच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेतल्याचे आढळले.
डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह अकोला शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलिसांनी नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे