छ.संभाजीनगर,२३ ऑक्टोबर (हि.स) वंचित बहुजन आघाडीच्या जन आक्रोश मोर्च्याला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. वंचित बहुजन आघाडीच्यावतीने 24 ऑक्टोबर २०२५ रोजी क्रांतीचौक ते संघ कार्यालय असा मोर्चा आयोजित करण्याची केलेली विनंती क्रांतीचौक पोलीस ठाण्याने फेटाळली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्तेवरील गुन्हे मागे घ्यावेत, या मुख्य मागणीसाठी हा मोर्चा दिनांक २४ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात येणार होता. या मोर्चासाठी परवानगी मिळावी म्हणून वंचित बहुजन आघाडी व इतर आंबेडकरी पक्ष-संघटनांच्या वतीने दिनांक २१/१०/२०२५ रोजी विनंती अर्ज क्रांतीचौक पोलीस ठाण्यात प्राप्त झाला होता.परंतु, मोर्चा दरम्यान किंवा मोर्चानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता पोलीस प्रशासनाने वर्तवली आहे. त्यामुळे क्रांतीचौक ते आरएसएस कार्यालय पर्यंत काढण्यात येणाऱ्या मोर्चास परवानगी नाकारण्यात आली आहे.
या संदर्भात पोलीस प्रशासनाने वंचित बहुजन आघाडी व संबंधित पक्ष-संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६८ प्रमाणे नोटीस दिली आहे. सदर मोर्चास परवानगी नाकारण्यात आली असल्याने संबंधितांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते अमित भुईगळ यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, कोणत्याही परिस्थितीत मोर्चा हा निघेल. परवानगी मिळू अथवा नाही, हा मोर्चा निघेल, असे त्यांनी सांगितले आहे.
-------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis