परभणी, 23 ऑक्टोबर (हिं.स.)। राज्यातील वर्ग 4 (चतुर्थ श्रेणी) आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत असल्याने, लवकरच राज्यव्यापी संप पुकारण्याचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील सभागृहात आयोजित चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
बैठकीला राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे राज्याध्यक्ष भाऊसाहेब पठाण प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. या वेळी परभणी जिल्ह्यातील वर्ग 4 कर्मचारी यांच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून भव्य सत्कार करण्यात आला. मंचावर महाराष्ट्र शासन नर्स फेडरेशनच्या जिल्हाध्यक्ष सौ. सुजाता कांबळे, संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष शेख सिराज, कॉम्रेड सय्यद अझर, महिला प्रमुख सौ. चंदा खंदारे यांची उपस्थिती होती.
मार्गदर्शन करताना भाऊसाहेब पठाण म्हणाले, “आरोग्य विभागातील वर्ग 4 कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती, जॉब चार्ट, जुनी पेन्शन योजना, तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वारसांना सेवेत सामावून घेणे या प्रमुख मागण्या दीर्घकाळ प्रलंबित आहेत. याशिवाय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 15,000 वरून केंद्र शासनाच्या प्रमाणे 18,000 रुपये करण्यात यावे, सेवा जेष्ठता, सफाई कामगारांच्या जातनिहाय लाभांचे प्रश्न, तसेच दुसरा व चौथा शनिवार सुट्टी लागू करण्यात यावी, या मागण्यांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा.” त्यांनी पुढे सांगितले की, “संघटनेचा संघर्ष शांत बसणार नाही. जर शासनाने दुर्लक्ष केले, तर राज्यभरात वर्ग 4 कर्मचारी संपावर जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही.”
बैठकीत विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली असून, कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा निघेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष शेख सिराज, श्रीकांत चव्हाण, अनवर चाऊस, रमेश मुठेकर, अरबाज शेख, गजानन घुगे, अमोल सैनिक, गजानन जावळे, शाहरुख खान, राजू दिल्लोड, चंदा खंदारे मॅडम, सय्यद अझर, शेख मुक्तार, सय्यद फहिम, आणि प्रशांत राठोड यांनी परिश्रम घेतले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis